एटीएसने परभणीतून आणखी एका युवकास उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2016 05:46 PM2016-07-24T17:46:11+5:302016-07-24T17:46:11+5:30
मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातून इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून एका 24 वर्षीय युवकास ताब्यात घेतले
ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 24 - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातून इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून एका 24 वर्षीय युवकास ताब्यात घेतले असून, या युवकांकडून 1 किलो स्फोटके व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईस दुजोराही दिला आहे़. विशेष म्हणजे मागील आठवड्यातच परभणी शहरातून एका युवकाविरूद्ध या पथकाने कारवाई केली होती़
आठ दिवसांपासून दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी परभणी शहरात पाळत ठेवून होते़ काही जणांवर या पथकाला संशय होता़ याच संशयातून २३ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरातून एका युवकाला या पथकाने ताब्यात घेतले आहे़ सदर युवकाकडून एक किलो वजनाच्या स्फोटक साहित्यासह आणखी काही संशयास्पद वस्तूही जप्त केल्याची माहिती समोर येत आहे़ या प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारची कारवाई केल्याच्या वृत्ताला या अधिकाऱ्यानी दुजोरा दिला आहे़ परंतु, ज्या युवकाला ताब्यात घेतले त्या युवकाचे नाव अधिकृरित्या पथकातील अधिकाऱ्यानी जाहीर केले नाही़ .
यापूर्वी १३ जुलै रोजी शहरातील गाडीवान मोहल्ला येथील नासेर खान या युवकाविरूद्ध दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून मुंबईत गुन्हा दाखल झाला होता़. त्यानंतर एका आठवड्यातच परभणी शहरातून दहशतवाद विरोधी पथकाने आणखी एका युवकाला ताब्यात घेतले आहे़