लातुरमध्ये बनावट कॉल सेंटर्सवर एटीएसचे छापे
By admin | Published: June 17, 2017 12:25 PM2017-06-17T12:25:47+5:302017-06-17T12:25:47+5:30
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं लातूर पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 17- महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं लातूर पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई झाली आहे. या छाप्यात पोलिसांनी एकूण ४ लाख ६० हजार रूपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. यावेळी पोलिसांनी दोन कॉल सेंटर चालकांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणावर सीमकार्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. त्या कॉल सेंटरचा आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंध असल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतो आहे. या फेक कॉलसेंटर्समुळे दूरसंचार विभागाला १५ कोटींचा महसूल बुडाल्याचंही बोललं जातं आहे.
बोगस कॉलसेंटर्सच्या माध्यमातून आरोपी लोकल मोबाइल क्रमांकानं बेकायदा पद्धतीने आंतरराष्ट्रीय कॉल्स हाताळत असल्याचं उघड झालं आहे. आंतरराष्ट्रीय कॉल अनधिकृत गेटवेच्या साहाय्याने लोकल लाइनवर वळवायचे असा हा बोगस कारभार लातूरमध्ये सुरू होता. याबाबत अधिक तपास केल्यानंतर शहराच्या प्रकाश नगर, आणि नंदी स्टॉप भागातून सर्वाधिक कॉल केले गेले असल्याचं निदर्शनास आलं, अशी माहिती पोलीसांच्या सूत्रांनी दिली आहे. या माहितीच्या आधारावर औरंगाबाद एटीएसने लातूर पोलिसांना सोबत घेत प्रकाश नगर येथेली बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला. त्या कारवाईत पोलिसांनी 96 सिमकार्ड, एक कम्प्युटर, सीपीयू, ३ अनधिकृत कॉल ट्रान्सफॉर्मिंग मशिन्स जप्त केल्या.
गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी अनधिकृतरित्या हे कॉलसेंटर चालवत असल्याचंही समोर आलं आहे. यावेळी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत वालनवाडी येथेसुद्धा अशाचप्रकारचे कॉलसेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली. वालनवाडी येथे कारवाई केल्यानंतर पोलिसांनी १४ सिमकार्ड आणि १ लाख २० हजार इतक्या किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्या. याप्रकरणी एका वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल ६४ सिमकार्ड, एक लॅपटॉप, २ आंतरराष्ट्रीय गेट-वे मशिन्स आणि दीड लाख रुपयांचं एक मशिन असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
हे आरोपी आंतरराष्ट्रीय कॉल अनधिकृतपणे गेटवेच्या साहाय्याने लोकल लाइनवर वळवत होते. एखाद्या गुप्त माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी लष्कराकडून अशाप्रकारच्या कॉल्सचा वापर केला जातो. त्यासाठी आरोपींनी एक अॅप्लिकेशन बनवलं होतं अशीही माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.