लगाव बत्ती...
By admin | Published: January 25, 2017 02:55 AM2017-01-25T02:55:39+5:302017-01-25T02:55:39+5:30
अकबर अन् बिरबलाची ‘पोपट मेला... पण सांगणार कोण?’ ही कथा नक्कीच आठवत असेल प्रत्येकाला. शहेनशहाचा लाडका पोपट मेल्याचं सांगून स्वत:च्या मानेवर कुऱ्हाड ओढवून घेण्यास म्हणे, त्या वेळी कुणीच तयार नव्हतं
अकबर अन् बिरबलाची ‘पोपट मेला... पण सांगणार कोण?’ ही कथा नक्कीच आठवत असेल प्रत्येकाला. शहेनशहाचा लाडका पोपट मेल्याचं सांगून स्वत:च्या मानेवर कुऱ्हाड ओढवून घेण्यास म्हणे, त्या वेळी कुणीच तयार नव्हतं... अग्गऽऽदी तश्शीऽऽच परिस्थिती मुंबईत झालीऽऽय बरं का. ‘बाण’वाल्याचं ‘कमळा’बाईबरोबर त्रांगडं झालंय. ‘युती’ का ‘फिती’ तुटलीय... हे कुणीच स्पष्ट बोलायला तयार नाहीये. मग अशा वेळी धावून आला, एक आधुनिक बिरबल... अन् मग नंतर पुढं काय झालं, हे पाहू या थेट राजदरबारातून...
उद्धो महाराज : (मागं हात बांधून अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत) मिलिंदाऽऽ कुठं गेलेत आपले सारे सरदार?
मिलिंद : (कुर्निसात करत) दिवाकरराव एसटीच्या टेंडरमध्ये अडकलेत तर....
उद्धो महाराज : (चरफडत) मला मंत्री-संत्री नको, तर महापालिकेतल्या सत्तेच्या मोसंबीबद्दल माहिती हवीय. कुठाय आपली युती?
एकनाथ : आपली युती एकदम ठीक महाराजऽऽ. फक्त आजच्या मीटिंगमध्ये त्यांनी दहा जागा आणखी वाढविल्यात. प्रत्येक ठिकाणी म्हणे त्यांचाच माणूस येण्याची एक हजार एकशे एक टक्के गॅरंटी.
उद्धो महाराज : (कपाळावर आठ्या) प्रत्येक वेळी वाढत जायला ती ‘दंगल’मधल्या आमिरची जाडी आहे की नोटाबंदीची समस्या सोडविण्याची मुदत? अशानं कशी राहणार युती?
अनिल : राहणार महाराजऽऽ नक्की राहणार. फक्त आज किरीटभार्इंच्या तोंडी माफिया शब्द तब्बल नव्याण्णव वेळा आला. बहुधा उद्याच ते सेन्च्युरी ठोकणार.
उद्धो महाराज : (डोळे वटारत) खामोश.. कॅमेरा दिसताच जीभ सोडणाऱ्यांची भाषा तुम्ही सहन केलीच कशी? अशानं कशी टिकणार युती?
मिलिंद : टिकणार महाराजऽऽ टिकणार युती. फक्त राऊतांच्या पेनातली शाई काढून दिल्लीश्वरांना कुर्निसात करण्याचं फर्मान सोडलंय रावसाहेबांनी.
उद्धो महाराज : (आवाज चढवत) खामोशऽऽ आम्ही खुर्चीसाठी हतबल झालोत, याचा अर्थ सत्तेसाठी लाचार नाही... अशा अटींनी कशी जुळणार युती?
एकनाथ : जुळणार महाराजऽऽ जुळणार युती. फक्त आपल्या रस्त्यांच्या खड्ड्यातल्या पाण्याची पारदर्शकता पाहण्यासाठी शेलारमामा मोठं भिंग घेऊन गल्लीगल्ली फिरताहेत.
उद्धो महाराज : (आवाजाचं डेसिबल थेट डीजेमध्ये रूपांतर करत) अरे... युती गेली खड्ड्यात. तुम्ही सारेजण मला स्पष्टपणे का सांगत नाही की, पोपट मेला...म्हणजे युती तुटली. युती संपली, युतीचा खेळ खल्लाऽऽस!
सारे एकसुरात : (मान खाली घालून) आम्हाला भीती वाटत होती महाराज. (तेवढ्यात मोठ्या आनंदानं आदित्य युवराज दरबारात प्रवेशतात.)
युवराज : खेळ खल्लाऽऽस नाही होणार महाराज.. कारण देवेंद्र पंतांनी आत्ताच ‘च्यानल’वाल्यांना सांगितलंय की, उद्धो महाराज माझे जीवलग मित्र. त्यांच्यासाठी काय पण.. कधी पण.. कुठं पण.. अगदी मुंबई पालिकेत पणऽऽ
उद्धो महाराज : (मोठ्या आशेनं) काय म्हणता कायऽऽ म्हणजे पोपट जिवंत आहे?
युवराज : (डोकं खाजवत) होय महाराजऽऽ चौघेजण टपली मारताहेत, त्यामुळं पोपट अर्धमेला होतोय. मग लगेच दुसरा कुरवाळतोय, त्यामुळे पोपट पुन्हा जगण्याची आशा धरतोय... पण खरं सांगू? हा पोपट मेल्यातच जमा आहे महाराऽऽज.
- सचिन जवळकोटे