लगाव बत्ती...
By सचिन जवळकोटे | Published: December 16, 2018 12:22 AM2018-12-16T00:22:26+5:302018-12-16T00:41:16+5:30
तीन देशमुखांची भाकरी... चार मालकांचा तवा...
!भाकरी करपू नये म्हणून फिरवावी लागते; परंतु ‘कमळ’वाल्यांची चूल लईच भारीऽऽ. त्यांनी भाकरीसाठी ‘तवा’च बदलण्याचा निर्णय घेतलाय. ‘दक्षिण’मधल्या ‘बापूं’ना ‘माढ्या’त, तर ‘उत्तर’मधल्या ‘मालकां’ना ‘अक्कलकोट’मध्ये पाठविण्याची व्यूहरचना आखलीय...परंतु या साºया चित्रविचित्र खेळात एका देशमुखांमुळं बाकीचे दोन देशमुख, तर एका विजूमालकांमुळं आणखी तीन मालक कामाला लागलेत.. त्याचं काय ? लगाव बत्ती...
मामांच्या कारखान्याला ‘वीस’ खोक्यांची रसद !
काही दिवसांपूर्वी तावडेंच्या विनोदरावांनी गुपचूपपणे आपल्या पार्टीच्या आमदारांचं ‘होमग्राऊंड’ तपासलं. ‘खाकी’मार्फत राबविलेल्या शोध मोहिमेत तब्बल ३८ आमदारांच्या ‘मेरीट’ डाऊनचा रिपोर्ट देवेंद्रपंतांना सादर झाला. त्यानुसार, या आमदारांचा मतदारसंघ बदलणं किंवा मतदारसंघातला आमदारच बदलणं, हे निश्चित झालं. विशेष म्हणजे, सोलापुरातील दोन्ही देशमुखांचीही नावं या यादीत असल्याची कुणकुण आम्हा पामरांना लागलीय. आता ही सारी खडान्खडा बित्तंबातमी आमच्या कानापर्यंत पोहोचते कशी, एवढं मात्र विचारू नका.
असो. ‘दक्षिण’मधल्या ‘सुभाषबापूं’ची भाकरी फिरविण्याची तयारी जोरात सुरू झालीय. ‘माढा लोकसभे’च्या तव्यावर ही भाकरी फिरविण्याचा म्हणे जवळपास निर्णयही झालाय. ‘बापू’ही भलतेच कामाला लागलेत. ‘संजयमामां’सोबत अनेक बैठका झडल्यात. ‘आमच्या माढा-करमाळा पट्ट्यातील स्थानिक राजकारणात ढवळाढवळ होणार नसेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत,’ असा शब्दही म्हणे ‘संजयमामां’नी दिलाय.
‘अकलूजकरां’च्या दगडापेक्षा ‘लोकमंगल’कारांची वीट मऊ, या न्यायानं शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणत ‘बापू-मामा’ एकत्र येऊ पाहताहेत. यासाठीच की काय, गेल्या आठवड्यात मामांच्या कारखान्याला ‘वीस’ खोक्यांची रसद राज्य बँकेतून पुरविली गेलीय... कारण या बँकेत सध्या ‘कुबेर’ म्हणून ‘बापूं’चे लाडके ‘अवी’च बसलेत.
...परंतु या साºया गडबडीत इतर तालुक्यातल्या मामा मित्रांची गोची झालीय की रावऽऽ. पंढरपूरच्या धाकल्या पंतांना हा निर्णय मान्य नसला तरी देवेंद्रपंतांच्या शब्दाखातर बापूंचा प्रचार करावाच लागेल. बिच्चारे धाकले पंतऽऽ कधी पंढरीतल्या मोठ्या पंतांचं तर कधी मुंबैतल्या देवेंद्रपंतांचं ऐकण्यातच निम्मं आयुष्य चाललंय.
सांगोल्याच्या ‘शहाजीबापूं’चं म्हणे ‘सुभाषबापूं’ना एवढं टेन्शन नाही; कारण वडाळ्याचे बापू मूळचे कॉन्ट्रॅक्टर. असली बक्कळ टेंडरं परस्पर मॅनेज करण्यात त्यांची जिंदगानी गेलेली. माळशिरस तालुक्यातही याचा ‘उत्तम’ अनुभव बापूंना येऊ शकतो. ‘माण’चे ‘जयाभाव’ही म्हणे असल्या टेंडरा-टेंडरीत भलतेच माहीर. या साºया पार्श्वभूमीवर यंदा समोर बारामतीतलं ‘शरदाचं चांदणं’ नसल्यानं ‘बापूं’ची लढत जोरदार होणार, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ. राहता राहिला विषय... समोरचा प्रतिस्पर्धी कोण?
माढ्यासाठी म्हणे ‘बापूं’ना जिल्ह्याचं पालकत्व...
‘सुभाषबापू’ यापूर्वीही माढ्याच्या तालमीत शड्डू ठोकून आलेले. तिथल्या मातीचा स्पर्श त्यांच्या अंगाला (पर्यायानं पाठीलाही) झालाय. गेल्यावेळी नव्या वाड्या-वस्त्या हुडकताना त्यांची पावलं पार ठेचकाळायची; परंतु यंदा ‘मोदी’ टीममध्ये अजून एका खासदाराची भर घालण्याच्या मोहिमेत पूर्वीइतका त्रास नाही होणार; कारण मुंबै-दिल्लीत सत्ता. सोबतीला लाल दिव्याची गाडी; त्यामुळे मोहिते-पाटलांच्या अकलुजात अन् नाईक-निंबाळकरांच्या फलटणात लवकरच ‘लोकमंगल’च्या शाखा निघाल्या तर आश्चर्य वाटायला नको.
...परंतु शाखा निघतील तेव्हा निघतील. अगोदर ‘जिल्ह्याचं पालकत्व’ मिळविण्यासाठी ‘सुभाषबापूं’नी जोरदार फिल्डिंग लावलीय. ‘देवेंद्रपंतां’चा उद्या सोलापूर दौरा. त्यानंतर पुढच्या आठवड्यात कदाचित बापूंच्या पालकत्वाची होऊ शकते घोषणा. तेवढीच अडीच महिन्यात भीमा-सीना खोºयात बांध-बंदिस्ती; पण एका देशमुखांच्या सुपरफास्ट घडामोडींमुळे बाकीचे दोन देशमुख कामाला लागलेत, त्याचं काय ? हे दोन म्हणजे एक प्रभाकर अन् विजूमालक होऽऽ.
दिलीप मालकांचं
बल्ले बल्ले..
च् ‘सुभाषबापू’ माढ्यात गेल्यानंतर ‘दक्षिण’चं काय ? इथला वारसदार कोण ? हा प्रश्न पवारांच्या शहाजींना ‘गुदगुल्या’ करणारा वाटू शकतो; मात्र त्यामागचे चिमटे त्यांना इथं उभारल्यानंतरच समजतील. अधिक माहितीसाठी कुमठ्याचे दिलीप मालक, इंडीचे रवीअण्णा अन् देगावचे गणेशदादा यांच्याशी त्यांनी संपर्क साधायला हरकत नाही.
च्एक मात्र खरं, ‘बापूंची माढा स्वारी’ कानावर पडल्यापासून कुमठ्याचे ‘दिलीप मालक’ लईऽऽ खूश...कारण ते नेहमी म्हणायचे, ‘बापूंकडं बँक, फॅक्टरी अन् कॉलेज. माझ्याकडंही बँक, फॅक्टरी अन् कॉलेज...फिर भी उनकी इमेज मेरे से बेहतर कैसी ?’ आता तो विषयच संपेल. ‘बापूं’सारखा तगडा उमेदवार समोर नसल्यानं ‘दिलीप मालकां’ना आतापासूनच आकाश दोन बोटं उरलंय.
.. पण थांबा मालकऽऽ गडबड नको. लाडके परममित्र ‘विजूमालक’ही ‘उत्तर’मधून ‘दक्षिण प्रस्थान’च्या तयारीत. म्हणजे ‘दिलीपमालकां’समोर पुन्हा लोच्या. एक देशमुख गेले म्हणेपर्यंत दुसरे देशमुख हजर? लगाव बत्ती...
‘विजू मालक’ म्हणे अक्कलकोटात !
‘उत्तर’चे ‘विजूमालक’ जरी ‘दक्षिण’कडं तोंड करून स्थलांतराच्या तयारीत असले तरी पार्टीची भूमिका काही वेगळीच दिसू लागलीय. ज्या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवार तगडा असेल तिथं आपली प्रस्थापित मंडळी पाठविण्यावर ‘कमळ’वाल्यांचा भर.
म्हणूनच ‘अक्कलकोट’मध्ये ‘सिद्धूअण्णां’ना शह देण्यासाठी ‘विजूमालक’ चर्चेत येऊ लागलेत. ‘भुकटी’ंच्या अनुदानामुळं लोकांसाठी दर्शन दुर्मिळ होऊन बसलेले ‘सचिनदादा’ही चक्रावलेत. पूर्वी स्वप्नात ‘भुकटी’ यायची. आता तर पुरती झोप उडालीय.
पण पुुन्हा एक नवा प्रश्न. ‘उत्तर’मध्ये कोण ? पण काळजी नको. इथंही एक ‘ज्युनिअर मालक’ सम्राट चौकातल्या मंगल कार्यालयात अगोदरच संपर्क कार्यालय थाटून तयारीतच बसलेत. फक्त या ‘वीरभद्रेशां’ची एक सुप्त इच्छा...त्यांनाही प्रत्येकानं ‘मालक’च म्हटलं पाहिजे. अरे बापरेऽऽ हिंग ह्यांगरी मालकरूऽऽ?
(लेखक लोकमत सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत )