कोर्टाच्या आवारात आरोपीचा माफीच्या साक्षीदारावर हल्ला
By admin | Published: June 9, 2017 06:02 AM2017-06-09T06:02:50+5:302017-06-09T06:05:15+5:30
एका आरोपीने आपल्या सहकाऱ्यावर लोखंडी पट्टीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी दक्षिण मुुंबईतील सत्र न्यायालयाच्या आवारात घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खुनाच्या खटल्यात माफीचा साक्षीदार बनल्याचा राग मनात धरून एका आरोपीने आपल्या सहकाऱ्यावर लोखंडी पट्टीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी दक्षिण मुुंबईतील सत्र न्यायालयाच्या आवारात घडली. मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी प्रसंगावधान दाखविल्याने हा हल्ला निष्फळ ठरला. या घटनेमुळे पक्षकार व वकिलांमुळे गजबजलेल्या न्यायालयाच्या आवारात काहीवेळ खळबळ उडाली.
उदय पाठक असे हल्लेखोर कैद्याचे नाव असून त्याला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने कल्पेश पटेलच्या डोक्यात आणि मानेवर लोखंडी पट्टीने वार केले. मात्र पोलिसांनी त्याला वेळीच बाजूला काढल्याने तो बचावला. २०११ साली विरार व्हिलेज येथे झालेल्या चार जणांच्या हत्याकांडामध्ये उदय पाठक हा मुख्य आरोपी असून त्यामध्ये कल्पेश पटेलही सहआरोपी आहे. पोलिसांनी त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल केले आहे. दोघेजण सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. पटेल हा या खटल्यात माफीचा साक्षीदार झाल्याने उदय पाठक त्याच्यावर चिडून होता. सत्र न्यायालयात सुनावणी असल्याने गुरुवारी दोघांना पोलिसांनी स्वतंत्र वाहनातून कोर्टात आणले. कोर्ट रुम नं. १७ मध्ये त्यांना नेत असताना दोघे समोरासमोर आले. त्यावेळी पाठकने आपल्यासमवेत कापडात दडवून आणलेल्या लोखंडी पट्टीने त्याच्या डोक्यावर व मानेवर वार केले. मात्र कल्पेशच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे त्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्याला बाजूला ओढले. त्यावेळी पाठकने पोलिसांनाही शिवीगाळ करत पटेलला मारण्याची धमकी दिली. कल्पेशच्या आरडाओरडीमुळे आणि आकस्मितपणे घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालयाच्या आवारात काहीवेळ खळबळ उडाली. पोलिसांनी पाठकला पकडून तातडीने कुलाबा पोलीस ठाण्यात नेले. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.