हा बँकिंग सिस्टिमवरील हल्ला : मिलिंद काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 08:25 PM2018-08-14T20:25:38+5:302018-08-14T20:29:29+5:30
जुलैमध्येच रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन बँकेच्या सर्व्हरची सुरक्षा प्रणालीची तपासणी केली होती़. हा आंतरराष्ट्रीय हॅकर्सनी एकाच वेळी वेगवेगळ्या २८ देशातून हा हल्ला केला आहे़.
पुणे : कॉसमॉस बँकेच्या कार्डधारकांच्या कार्डाचे क्लोन करुन प्रॉक्सी स्विच मार्फत हा सायबर हल्ला करण्यात आला असून हा केवळ भारतातीलच नाही तर जगभरात ४५ देशात वापरण्यात येत असलेल्या बँकिंग सिस्टिमवर आणि सिस्टिमच्या कम्युनिकेशनवर हल्ला आहे़. या सायबर हल्ल्यात कोणत्याही बँक खातेधारकाच्या खात्यातून पैसे काढले गेले नसल्याचे त्यांना काहीही धोका नाही़ त्यांचे पैसे सुरक्षित असल्याचे कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सांगितले़.
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर झालेल्या सायबर हल्ल्याची माहिती बँकेने पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी दिली़. यावेळी समुह अध्यक्ष डॉ़ मुकुंद अभ्यंकर, उपाध्यक्ष गोविंद क्षीरसागर, व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले, संचालक कृष्णकुमार गोयल, राजीव साबडे, कॉसमॉस ई सोल्युशन्सच्या व्यवस्थापकीय संचालक आरती ढोले उपस्थित होते़.
मिलिंद काळे म्हणाले, बँकेने आवश्यक ते सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त असलेल्या सर्व एजन्सींजकडून त्याची वेळोवेळी तपासणी करुन घेतली आहे़. जुलैमध्येच रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन बँकेच्या सर्व्हरची सुरक्षा प्रणालीची तपासणी केली होती़. हा आंतरराष्ट्रीय हॅकर्सनी एकाच वेळी वेगवेगळ्या २८ देशातून हा हल्ला केला आहे़. अनेकदा बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्याचे संदेश देतात़, बँकेकडून व्यवहार झाल्याचे सांगितले जाते़. प्रत्यक्षात एटीएममधून पैसे मिळत नाही़ अशावेळी प्रत्यक्षात हे व्यवहार झाले असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्ष एटीएममधून पैसे दिले गेले आहेत, का याची तपासणी करण्यात येत आहे़. त्याला किमान ७ दिवस लागतात़. त्यानंतरच या सायबर हल्ल्यामध्ये नेमकी किती रक्कम काढली गेली हे स्पष्ट होईल़. आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बँका आणि कार्ड कंपन्यांमधील करारानुसार या सर्व व्यवहाराचे बँकेने पेमेंट केले आहे़.
या हल्ल्याची रिझर्व्ह बँकेनेही गंभीर दखल घेतली असून त्यांचे तीन अधिकारी पुण्यात आले आहेत़. त्याचबरोबर या सायबर हल्ल्याच्या तपासासाठी तपास एजन्सीकडे काम सोपविण्यात आले आहे़. या हल्ला कोठून व कसा झाला याचा माग ते काढत आहेत़.
बँकेचे देशभरात दररोज साधारण ८ कोटी रुपयांचे व्यवहार कार्डमार्फत होतात़. त्यातील साडेपाच कोटी रुपयांच्या व्यवहार सुरळीत होते़. आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने व्यवहार झाल्याने व्हिसा कार्ड कंपनीला ते लक्षात आले़ पण बँकेच्या सर्व्हरवर त्या व्यवहाराची नोंद होत नसल्याने बँकेच्या लक्षात हा प्रकार आला नाही़.
बॅकांमधील व्यवहार दर ७ दिवसांनी पूर्ण केले जात असल्याने या व्यवहाराची सर्व माहिती येण्यास व त्यातून प्रत्यक्ष किती रक्कम काढली गेली हे समजण्यास ७ दिवस लागणार आहेत़. या कोणत्याही संशयास्पद व्यवहारांची रक्कम बँकेच्या कोणत्याही खातेदारांच्या खात्यातून काढली गेलेली नाही व जाणारही नाही़. खातेदारांच्या मुदत ठेव, बचत व रिकरिंग खात्यातील रक्कमा सुरक्षित असल्याने खातेदारांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन मिलिंद काळे यांनी केले आहे़ .
़़़़़
* हा केवळ कॉसमॉस बँकेवरील नाही तर २८ देशातील बँकिंग सिस्टिमवर हल्ला
* बँकिंग सिस्टिमच्या पेमेंट गेटवेवरचा हा हल्ला आहे़
* खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कार्डवरील व्यवहार स्थगित
* नविन स्विच सिस्टिम तयार करुन त्याची पडताळणी करुन घेण्यात येत आहे़
* सर्व आवश्यक सुरक्षा एजन्सींकडून मान्यता मिळाल्यानंतरच नवीन स्विच सिस्टिम सुरु करणार
* तोपर्यंत एटीएम सेवा व कार्ड सेवा, मोबाईल बँकिंग स्थगित
* बँकेच्या शाखांमध्ये पैसे देण्यासाठी जादा सुविधा
* आरटीजीएस करण्यासाठी सर्व शाखांमध्ये विशेष सुविधा उपलब्ध
* खातेदारांना कोणत्याही खात्यातून पैसे गेले नाहीत़
* बँकेच्या १४० शाखा असून ५० लाख खातेदार
* एकाच वेळी परदेशात व्हिसा व देशात रुपे कार्ड द्वारे फसवणूक