निवडणूक अधिकाऱ्यावर केला हल्ला
By Admin | Published: October 16, 2016 12:39 AM2016-10-16T00:39:32+5:302016-10-16T00:39:32+5:30
कार्यालयीन वेळेनंतर, मतदारनोंदणीचे अर्ज स्वीकारण्यास नकार देणाऱ्या मुरबाड तहसलीदार कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या विशाल
मुरबाड : कार्यालयीन वेळेनंतर, मतदारनोंदणीचे अर्ज स्वीकारण्यास नकार देणाऱ्या मुरबाड तहसलीदार कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या विशाल घरत व सचिन घरत या दोन शिवसैनिकांवर, मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असला, तरी जोपर्यंत या हल्लेखोरांना अटक होत नाही, तोपर्यंत लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी झाल्याने, या प्रकरणामुळे विभागीय चौकशीस अनेक अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले होते. या ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून सतर्कता बाळगली जात असताना, विशाल आणि सचिन यांनी निवडणूक अधिकारी विलास तुंगार यांच्यावर दबाव आणला. (प्रतिनिधी)
महसूल प्रशासनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी, मुरबाड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा व कर्मचाऱ्यास जबर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
- एस.एम. मते, सहायक पो. निरीक्षक
महसूल कर्मचाऱ्याला झालेली मारहाण ही निंदनीय असून, या विरोधात प्रशासनाने लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे.
- अजय पाटील, निवासी नायब तहसीलदार
- महसूल
कर्मचारी संघटना, ठाणे जिल्हा
यांनी सोमवार १७ आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.