प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यावर हल्ला

By admin | Published: May 13, 2016 04:00 AM2016-05-13T04:00:43+5:302016-05-13T04:00:43+5:30

आपल्या मुलीने भावकीतीलच एकाशी पळून जाऊन प्रेमविवाह केला म्हणून मुलीकडच्यांनी केलेल्या हल्ल्यात जोडप्यासह पाच जखमी झाले. चार वर्षांपूर्वी लग्न केल्यानंतर हे जोडपे प्रथमच यात्रेसाठी गावात आले होते.

An attack on a married couple | प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यावर हल्ला

प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यावर हल्ला

Next

सातारा : आपल्या मुलीने भावकीतीलच एकाशी पळून जाऊन प्रेमविवाह केला म्हणून मुलीकडच्यांनी केलेल्या हल्ल्यात जोडप्यासह पाच जखमी झाले. चार वर्षांपूर्वी लग्न केल्यानंतर हे जोडपे प्रथमच यात्रेसाठी गावात आले होते. सध्या गाजत असलेल्या ‘सैराट’ चित्रपटातील कथानकासारखा थरार सातारा तालुक्यातील गजवडीत बुधवारी मध्यरात्री घडला.
गजवडी (ता. सातारा) येथील विनायक कदम याने गावातीलच उषा हिच्याशी २०१२ मध्ये प्रेमविवाह केला. भावकीत लग्न झाल्याने उषाकडील मंडळी चिडून होती. लग्न झाल्यानंतर विनायक कधीच गावाला आला नाही. लग्नाला चार वर्षे झाली. मुलगाही झाला. आता सगळ्यांचाच राग मावळला असेल, अशी भावना घेऊन ग्रामदैवताच्या पायावर मुलाला घालण्यासाठी विनायक यंदा पहिल्यांदाच गावी आला.
जत्रेनिमित्त गजवडीमध्ये अवघे गाव येथे जमा झाले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास विनायकच्या घराकडे हातात कुऱ्हाड, दांडकी, गज घेऊन मुलीकडची मंडळी येत असल्याचे विनायकचे वडील शंकर कदम यांनी पाहिले. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने मुख्य लोखंडी दरवाजा आतून बंद करून घेतला.
संतप्त झालेल्या या मंडळींनी दारावर पहार आणि दगड मारून तो तोडण्याचा प्रयत्न केला. पुढचे दार तुटत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मागच्या लाकडी दाराकडे मोर्चा वळविला. मागचे दार तोडल्यानंतर विनायकचे वडील पुढे धावले. त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार झाल्याने खोलीत रक्ताच्या चिळकांड्या उडल्या. ते गंभीर जखमी झाले. घरात असलेल्या विनायक आणि उषा यांच्यासह सर्वांना त्यांनी बेदम मारहाण केली. पोलिस पाटील अमन पटेल यांनी तातडीने तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. जखमी शंकर वामन कदम, पार्वती शंकर कदम, दिनकर वामन कदम, विनायक शंकर कदम आणि सुनंदा शंकर कदम यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
याप्रकरणी मुंबई पोलिसांत काम करणारा काका दिनकर नामदेव कदम, शंकर नामदेव कदम, लता शंकर कदम, अनिता दिनकर कदम, अश्विन शंकर कदम यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: An attack on a married couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.