नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन; सरकारविरोधात माहोल तयार करा- शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 01:09 AM2017-11-19T01:09:19+5:302017-11-19T01:09:29+5:30
कुठलीही वातावरण निर्मिती आपोआप होत नाही. विद्यमान सरकारच्या विरोधात माहोल तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विविध जाती, धर्मांच्या लोकांमध्ये विस्तार करण्याची गरज आहे.
वर्धा : कुठलीही वातावरण निर्मिती आपोआप होत नाही. विद्यमान सरकारच्या विरोधात माहोल तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विविध जाती, धर्मांच्या लोकांमध्ये विस्तार करण्याची गरज आहे. सर्व जाती धर्माचे लोक पक्षाशी जुळले तर यश हे निश्चितपणे पदरात पडेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
वर्धा येथे पक्षाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले की, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर इंदिराजींनी वर्धा जिल्ह्यातील पवनार भूमीतून पक्ष बांधणीला सुरूवात केली. वर्धेची भूमी ही विनोबा व गांधी यांच्यामुळे पावन झाली आहे. त्यामुळे येथूनच विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
विद्यमान सरकारने चावडीवर कर्जमाफीच्या याद्यांचे वाचन करून शेतकºयांचा स्वाभिमान रस्त्यावर आणला आहे. त्यामुळे विदर्भात आत्महत्या वाढल्यात.
आतापर्यंत ६९० शेतकºयांनी मागील तीन महिन्यांत आत्महत्या केल्या. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपने ‘कुठे नेऊन ठेवला रे
महाराष्ट्र माझा’, अशी विचारणा सत्ताधारी पक्षाकडे केली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला, हे विचारण्याची वेळ आली आहे, असेही पवार म्हणाले.