अनधिकृत बांधकामे पाडताना महापालिकेच्या पथकावर हल्ला
By admin | Published: June 11, 2016 02:14 AM2016-06-11T02:14:19+5:302016-06-11T02:14:19+5:30
तानसा पाइपलाइनलगतच्या दोन्ही बाजूच्या १० मीटर भागातील अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई शुक्रवारी सुरू होती.
मुंबई : कुर्ला पूर्वेकडील तानसा पाइपलाइनलगतच्या दोन्ही बाजूच्या १० मीटर भागातील अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई शुक्रवारी सुरू होती. या वेळी हार्बर मार्गावरील टिळकनगर स्टेशनजवळील आदर्शनगर व शास्त्रीनगर परिसरात अचानक १० ते २० जणांच्या जमावाने महापालिकेच्या कारवाई पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात महापालिकेचे जेसीबी आॅपरेटर धर्मेंद्र यादव जखमी झाले. यादव यांच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
गेल्या तीन दिवसांत तानसा पाइपलाइनजवळील ७२५ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली आहेत. यापैकी पात्रताधारकांना पर्यायी निवास व्यवस्था महापालिकेच्या संबंधित धोरणानुसार यापूर्वीच देण्यात आली आहे. मात्र पर्यायी निवासस्थानांचा ताबा घेऊनही संबंधित पात्रताधारक पर्यायी जागी राहायला जात नाहीत. शुक्रवारच्या घटनेनंतर येथील कारवाई तात्पुरती स्थगित केली असून, ही कारवाई लवकरच सुरू होईल, असे एम-पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त हर्षद काळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)