शरद पवारांच्या घरावर हल्ला, शेकडो एसटी कर्मचाऱ्यांकडून निदर्शने; चप्पल, दगडही फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 06:06 AM2022-04-09T06:06:32+5:302022-04-09T06:07:09+5:30

आंदोलकांनी जोरदार निर्दशने करीत दगड, चप्पलफेक केली. महिलांनी बांगड्याही भिरकावल्या. आंदाेलकांवर  रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली हाेती.

Attack on Sharad Pawars house protests by hundreds of ST workers Slippers even threw stones | शरद पवारांच्या घरावर हल्ला, शेकडो एसटी कर्मचाऱ्यांकडून निदर्शने; चप्पल, दगडही फेकले

शरद पवारांच्या घरावर हल्ला, शेकडो एसटी कर्मचाऱ्यांकडून निदर्शने; चप्पल, दगडही फेकले

googlenewsNext

मुंबई :

उच्च न्यायालयाने गुरुवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले असताना, शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या एका जत्थ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला केला.

आंदोलकांनी जोरदार निर्दशने करीत दगड, चप्पलफेक केली. महिलांनी बांगड्याही भिरकावल्या. आंदाेलकांवर  रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली हाेती. या हल्ल्यामागे सूत्रधार कोण, याचा शोध सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा सदावर्ते यांना अटक करण्यात आली.

पोलिसांना झुगारत जोरदार घोषणाबाजी करत जमाव मुख्य रस्त्यावरून ‘सिल्व्हर ओक’वर धडकला. सुरक्षा रक्षकांनी मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलकांच्या रेट्यापुढे त्यांचा विरोध फिका पडला आणि आंदोलकांना रान मोकळे झाले. एसटी कर्मचारी सिल्व्हर ओकवर जाणार असल्याची कल्पना गुप्तचर यंत्रणेला कशी आली नाही, असा सवालही आता केला जात आहे. हल्ल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. सर्वपक्षीय नेतेमंडळींनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, हल्लेखोरांवर दंगलीचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली जाणार आहे. 

मुख्यमंत्र्यांची पवारांशी फोनवरून चर्चा
हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नेमकी घटना कशी घडली याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडून घेतली. या कृत्यामागे कोण आहेत ते शोधून कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

अस्वस्थता पसरविण्याचा काही शक्तींचा प्रयत्न
आमचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यामागे राजकीय पक्ष, अज्ञात शक्तींचा हात असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने चौकशी केली जाईल.     
- दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री 

मला अतिरेक्यासारखे आणले : सदावर्ते
मला अतिरेक्यासारखे आणले आहे. मी अतिरेकी नाही. माझी हत्या होऊ शकते. मला काही झाल्यास याला फक्त दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील, असे वक्तव्य सदावर्ते यांनी केले आहे.

चुकीच्या नेत्यांच्या हाती आंदोलन गेल्याने असे घडले
नेता चुकीचा असेल तर काय घडते, ते आजच्या घटनेने दिसले आहे. आपण आजही एसटी कर्मचाऱ्यांसोबतच आहोत; पण चुकीच्या नेतृत्वासोबत नक्कीच नाही.     
- शरद पवार

कर्मचाऱ्यांचा आराेप काय?
एसटी विलीनीकरणात शरद पवार आणि अजित पवार यांनी अडथळा आणल्याचा आरोप करीत हल्लेखोरांनी घोषणा दिल्या. 

सुप्रिया सुळे बाहेर आल्या, पण...
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी घराबाहेर येत आंदोलकांना शांत होण्याचे आवाहन केले; मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत, तुम्ही आधी शांत व्हा. त्याशिवाय बोलता येणार नाही, असे त्या सांगत असतानाही कामगारांची घोषणाबाजी सुरूच होती. त्यानंतर मात्र घरात माझे आई, बाबा आणि मुलगी आहे. त्यांची सुरक्षा मला पाहू दे, असे म्हणत सुप्रिया सुळे घरात गेल्या.

आंदाेलकांना आवरताना कसरत
पोलिसांची अतिरिक्त कुमक सिल्व्हर ओकवर दाखल झाली. पोलिसांनी सर्व आंदोलकांना बाहेर काढले. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. अखेर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलकांना बसमधून आझाद मैदानात घेऊन आले.

Web Title: Attack on Sharad Pawars house protests by hundreds of ST workers Slippers even threw stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.