'सिल्वर ओक'वरील हल्ला दुर्दैवी, गुणरत्न सदावर्तेंची भाषणं तपासली पाहिजेत: हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 05:48 PM2022-04-08T17:48:54+5:302022-04-08T17:49:21+5:30
एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यातच मंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांची भाषणं तपासली पाहिजेत, अशी मागणी केली आहे.
"आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर अशाप्रकारचा हल्ला होतो हे अतिशय दुर्दैवी आहे. मी गुणरत्न सदावर्तेंची काही भाषणं ऐकली. त्यांच्या भाषणांची तपासणी केली गेली पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांना उकसवण्याचं काम केलं जात आहे. पवारांच्या घरावरील हल्ला ही अतिशय अशोभनीय बाब आहे", असं हसन मुश्रीफ म्हणाले.
धनंजय मुंडेंनीही केला निषेध
"न्यायालयानं यासंदर्भात निर्णय दिला. त्याचं स्वागत केलं, पेढे वाढले आणि काही जण हे आंदोलन पेटत राहावं यासाठी प्रयत्न करत होते. आजपर्यंत शरद पवार हे कर्मचाऱ्यांच्या बाजूनं लढाईत उतरलेत. आजपर्यंत कोणतंही आंदोलन सत्ताधारी पक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या नेत्याच्या घरापर्यंत गेलं नाही. या सरकारनं जेवढे एसटी कर्मचाऱ्या बाजूनं निर्णय घेतले तितके कोणी घेतले नाहीत. यानंतरही आंदोलकांनी घरापर्यंत जावं, दगड फेकून, चपला फेकून मार्ग निघणार नाही. उद्या कोणीही कोणाच्या घरावर जाईल आणि आमच्या मागण्या मान्य करा, दगड फेकू चपला फेकू असं होईल, हे दुर्देवी आहे," असं धनंजय मुंडे म्हणाले.
कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत- वळसे पाटील
"एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे," अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.