असा झाला पानसरेंवर हल्ला...
By admin | Published: February 17, 2015 01:44 AM2015-02-17T01:44:50+5:302015-02-17T01:44:50+5:30
गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा हे दोघे नेहमी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिरायला बाहेर पडतात. सोमवारी ते थोडे उशिरा साडेसातच्या सुमारास फिरायला बाहेर पडले.
कोल्हापूर: गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा हे दोघे नेहमी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिरायला बाहेर पडतात. सोमवारी ते थोडे उशिरा साडेसातच्या सुमारास फिरायला बाहेर पडले. फिरून ते दोघे गप्पा मारत घरी येत असताना चंपालाल ओसवाल यांच्या बंगल्यासमोर येताच पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी खाली उतरून पाठीमागून व समोरून रिव्हॉल्व्हरमधून पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एक गोळी सरस्वती चुनेकर विद्यामंदिरच्या संरक्षण भिंतीला धडकली तर दोन गोळ्या पानसरे यांच्या छातीमध्ये व एक खांद्यामधून आरपार होऊन तोंडाच्या हनुवटीला घासून गेली. डोळ्यासमोर पतीवर झालेल्या हल्ल्याने उमा या जमिनीवर कोसळल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
घटनेची माहिती ओसवाल यांनी फोनवरून पोलीस नियंत्रण कक्षास दिली. काही क्षणांतच घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, करवीचे पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख, लक्ष्मीपुरीचे धन्यकुमार गोडसे, जुना राजवाड्याचे दिनकर मोहिते, करवीरचे दयानंद ढोमे, शाहूपुरीचे अरविंद चौधरी आदींसह पोलिसांची पथके दाखल झाली. त्यांच्यापाठोपाठ अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी आले. घटनेचे गांभीर्य ओळखून हल्लेखोर जिल्'ांतून बाहेर पडू नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी वायरलेसवरून जिल्'ात कडेकोट नाकाबंदीचे आदेश दिले. विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती
पानसरे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडून फोनवर घेतली. यावेळी त्यांनी डॉ. शर्मा यांना हल्लेखोरांचा सर्व पातळ्यांवर शोध घेण्याच्या सूचना केल्या.
घटनास्थळाचा पंचनामा
घटनास्थळावर पोलिसांना पाच पुंगळ्या मिळाल्या तसेच रक्ताचे व मातीचे नमुनेही पोलिसांनी यावेळी घेतले. हल्लेखोर काही पुरावा सोडून गेले आहेत का हे पाहण्यासाठी घटनास्थळाचा परिसर पोलिसांनी पिंजून काढला. पानसरे दाम्पत्यास पहिल्यांदा पाहिले तसेच शेजारील लोकांचे जबाब पोलिसांनी जाग्यावरच घेतले.