मज्जाव करणाऱ्या पोलिसांवर हल्ला
By Admin | Published: August 25, 2016 01:38 AM2016-08-25T01:38:02+5:302016-08-25T01:38:02+5:30
महाविद्यालयात घुसून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांना मज्जाव केला, म्हणून त्यांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला.
बारामती : येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात घुसून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांना मज्जाव केला, म्हणून त्यांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. यात ३ पोलीस जखमी झाले आहेत. १३ जणांसह अन्य १० ते १५ तरुणांवर जिवे मारण्याच्या प्रयत्नासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ५ जण ताब्यात घेतले आहेत.
मारहाणीत जखमी दोघांना ससून रुग्णालयात, तर एकास बारामतीच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत.
सागर देवकाते-पाटील या तरुणाला महाविद्यालयाच्या आवारात वाढदिवस साजरा करायचा होता. सुरक्षारक्षकाला धमकावून व मारहाण करून तरुण महाविद्यालयात जमले. हा प्रकार पोलिसांना कळविल्यानंतर ते तेथे आले. सागर देवकाते याच्या हातात तलवार होती. या वेळी काही मुले पोलीस वाहनाचे चालक सहायक फौजदार व्यवहारे यांच्याकडे गेले. त्यांना शिवीगाळ करून जोरात मारहाण केली. डोक्यावर खाली पाडून सर्वांनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर देवकाते याने सिमेंटचा पेव्हर ब्लॉक उचलून व्यवहारे यांच्या डोक्यात मारला. या वेळी सुदैवाने व्यवहारे यांनी डोके बाजूला घेतल्याने तो हुकला. त्यानंतरदेखील त्या सर्वांनी व्यवहारे यांच्या छातीवर, डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, पोलिसांची सरकारी गाडी (एमएच १२/आरआर ३८४) दगड मारून नुकसान केले.
भरदिवसा बारामतीसारख्या शहरामध्ये हा प्रकार घडल्याने
एकच खळबळ उडाली. वरिष्ठ
पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.
तरुणांच्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी राजेश साहेबराव गायकवाड, व्ही. एस. वाघमोडे, सहायक पोलीस फौजदार अर्जुन व्यवहारे जखमी झाले आहेत. गायकवाड यांनी स्वत: फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर देवकाते पाटील (रा. नीरावागज), महेश बापूराव जाधव (रा. मळद, ता. बारामती), स्वप्निल सुरेश देवकाते (रा. नीरावागज, ता. बारामती), राजन बळवंत शिंदे (रा. कसबा, बारामती), रोहित तानाजी मदने (रा. मळद, ता. बारामती), तुषार राजेंद्र वाडिले (रा. म्हाडा कॉलनी, ता. बारामती), तेजस देवकाते, योगेश सूळ, बापू खराडे, समीर देवकाते, अनिकेत देवकाते, अमोल पोपटराव देवकाते, सुनील सोनवलकर (रा. नीरावागज, ता. बारामती) या १३ जणांसह त्यांचे इतर १० ते १५ साथीदार (नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
> अचानक हल्ल्याने गोंधळ
पोलिसांवर अचानक या तरुणांच्या जमावाने हल्ला चढविल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यामुळे सुरक्षारक्षक व कॉलेजचे इतर कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. या गोंधळातच सर्व आरोपी पळून गेले. मात्र, एकाला ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अन्य आरोपींची ओळख पटली. त्यानुसार इतर पाच जणांना ताब्यात घेतले.