पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच
By admin | Published: September 7, 2016 05:59 AM2016-09-07T05:59:58+5:302016-09-07T05:59:58+5:30
पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, मंगळवारी हेल्मेट न घातलेल्यांवर कारवाई करणाऱ्या एका महिला पोलिसाला विलेपार्ले परिसरात शिवीगाळ करत अमानुषपणे मारहाण करण्यात आली.
मुंबई : पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, मंगळवारी हेल्मेट न घातलेल्यांवर कारवाई करणाऱ्या एका महिला पोलिसाला विलेपार्ले परिसरात शिवीगाळ करत अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या प्रकरणी भाऊ - बहिणीला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. तर लालबागचा राजा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या
महिला पोलीस अधिकाऱ्याला येथील कथित कार्यकर्त्याने धक्काबुक्की करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.
विलेपार्ल्यातील घटनेत पोलीस शिपाई प्रियांका खोत (३०) जखमी झाल्या आहेत. मंगळवारी सकाळी विलेपार्लेच्या सुभाष रोड परिसरात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई सुरू होती. तेथे त्या कर्तव्य बजावत होत्या. त्याच दरम्यान आरती सुरेश पाटलेकर (२७) ही तरुणी तिच्या स्कूटीवर बसून आली. तिने हेल्मेट न घातल्याने खोत यांनी तिला हटकले. त्या वेळी या दोघांमध्ये वाद सुरू झाला. तेव्हा पाटलेकर हिने खोत यांच्या श्रीमुखात भडकावली. इतकेच नव्हे, तर नंतर तिने खोत यांच्या पोटात लाथ मारली. त्यात त्या खाली कोसळल्या. याच दरम्यान पाटलेकरने तिचा मोठा भाऊ सुदर्शन यालाही बोलावून घेतले. त्याने खोत यांना ‘तुम्हाला बघून घेईन’ अशी धमकी दिली.
ही बाब विलेपार्ले पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत या बहीण-भावास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. खारमध्ये विलास शिंदे यांना अशाच प्रकारे मारहाण करण्यात आली होती. ज्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
तर लालबागचा राजा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यास सोमवारी दुपारी मंडळाच्या कार्यकर्त्याने धक्काबुक्की करत मारहाण केली. काळाचौकी पोलिसांनी या प्रकरणी लालबागचा राजाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक रेखा खजुरे या लालबागचा राजा येथे कर्तव्य बजावत होत्या. दुपारी एकच्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचलेल्या सागर मंगशे रहाटे (३०) याने लालबागच्या प्रवेशद्वारातून जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या वेळी महिला पोलीस अधिकारी खजुरे यांनी रहाटेला आत घुसण्यास विरोध केला. रहाटे याने लालबाग राजा मंडळाचा कार्यकर्ता असल्याचे सांगून महिला पोलिसाला दमदाटी करत धक्काबुक्की केली. या हल्ल्यात खजुरे जखमी झाल्या.
महिला पोलीस अधिकारी खजुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी आरोपी रहाटेवर भादंवि कलम ३५३, ३३२ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रहाटे हा काळाचौकी परिसरातील गणेशनगर इमारतीमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.