वाळूमाफियांचा तलाठ्यांवर हल्ला
By admin | Published: March 15, 2017 09:49 PM2017-03-15T21:49:56+5:302017-03-15T21:49:56+5:30
वाळूची तस्करी रोखण्यासाठी दबा धरून बसलेल्या तलाठ्यांच्या पथकावर मंगळवारी मध्यरात्री दोन वाहनांतून आलेल्या वाळू तस्करांनी हल्ला
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गाने होणाऱ्या वाळूची तस्करी रोखण्यासाठी दबा धरून बसलेल्या तलाठ्यांच्या पथकावर मंगळवारी मध्यरात्री दोन वाहनांतून आलेल्या वाळू तस्करांनी हल्ला चढवून बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका तलाठ्याचा डोळा फुटला असून, एकाचा भ्रमणध्वनीही तस्करांनी लंपास केला. या घटनेने जिल्ह्यात वाळूमाफियांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले असून, विशेष म्हणजे या पथकाला पोलीस संरक्षणही देण्यात आलेले नव्हते. निफाड तहसीलदाराच्या आदेशान्वये मंगळवारी रात्री नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर, दौलत किसन नागरे, प्रदीप तांबे, सागर शिर्के, किरण काळे हे एका पथकात तर दुसऱ्या पथकात सुभाष बागले, बाळासाहेब निफाडे, लक्ष्मीकांत शिंंदे, यामीन काद्री हे सहभागी झाले होते. रात्री बारा वाजेच्या सुमारास दोन्ही पथके आपल्या खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना ओझरच्या गडाख पेट्रोलपंपाजवळ हायवा ट्रक क्रमांक (एमएच १८, डीके ५१५४) हा वाळूने भरलेला जात असताना नागरे यांच्या पथकाने त्याला अडवून विचारपूस केली. या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरलेली होती तसेच परवान्यावरही खाडाखोड करण्यात आल्यामुळे सदरचा ट्रक कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात येत असताना पाठीमागून आलेल्या मारुती ब्रेझा (एमएच १५, सीके १७१७) व स्वीफ्ट डिझायर कार (क्रमांक एमएच १५, एफएफ ६५६३) मधून आलेल्या चार ते पाच जणांनी तलाठ्यांच्या पथकाला अडवून गाडी का पकडली, अशी विचारणा केली व मारहाण करण्यास सुरुवात केली. या तलाठ्यांवर दगडांचा मारा करण्यात आल्याने एकाचा डोळा फुटला तर काहींना मुका मार बसला. या घटनेनंतर वाळूचा ट्रक घेऊन माफिया फरार झाले. या घटनेमुळे जिल्ह्यात वाळूमाफियांनी डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले आहे.