गोव्यातील पर्यटकांवर हल्ला
By admin | Published: August 2, 2015 11:45 PM2015-08-02T23:45:44+5:302015-08-02T23:45:44+5:30
दोडामार्ग येथील घटना : भरदिवसा थरार; गाडी फोडली; दोघेजण जखमी, हल्लेखोर झरेबांबरमधील
दोडामार्ग : मांगेली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवून रविवारी सायंकाळी घरी परतणाऱ्या गोव्यातील पर्यटकांना दोडामार्ग बाजारपेठेत गाठून लाकडी दांडे व लोखंडी शिगांनी बेदम मारहाण केली. झरेबांबर येथील स्थानिक युवकांच्या टोळक्याने गाडीचा पाठलाग करीत क्वॉलीस गाडीही फोडली. या मारामारीत दोघेजण जखमी झाले आहेत. बीअरच्या फोडलेल्या बाटल्या पर्यटकांच्या डोक्यावर मारण्यात आल्या. या मारहाणीत मनोरथ मांजरेकर (वय ३५) व महेश नार्वेकर (३२, दोघेही रा. शारपोरा बारदेश, गोवा) हे दोघेजण जखमी झाले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोडामार्ग पोलीस ठाण्यात स्थानिक युवकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बाजारपेठेत असलेल्या स्त्रिया, लहान मुले व ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली. काही क्षण नेमका काय प्रकार घडला, हे कोणालाच न समजल्याने बाजारपेठेत लोकांची धावपळ उडाली. त्यानंतर काही ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत असलेल्या व भांबावलेल्या पर्यटकांना पोलिसांच्या स्वाधीन केले. तर हल्लेखोर स्थानिक युवकांचे टोळके गर्दीचा फायदा घेत पसार झाले. एखाद्या सिनेमाला शोभावे असा प्रकार बाजारपेठेत घडल्याने बाजारपेठेत तणावाचे वातावरण होते.
मांगेली येथील वर्षा पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी मांगेली येथे पर्यटकांची मोठी गर्दी होती. दुपारी १२च्या सुमारास गोव्यातील पर्यटक व झरेबांबर येथील स्थानिक युवकांमध्ये गाडी पार्किंगच्या किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करीत मद्याच्या नशेत असलेल्या स्थानिक युवकांच्या टोळक्याला तेथून जाण्यास सांगितले. मात्र, हाच राग मनात धरून झरेबांबर येथील युवकांच्या टोळक्याने त्याचा वचपा काढण्याचा निर्णय घेतला होता. सायंकाळी ५ च्या सुमारास गोव्यातील पर्यटक घरी परतत असताना झरेबांबर याठिकाणी त्यांना अद्दल घडविण्यासाठी थांबलेल्या स्थानिक युवकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या हातात लोखंडी शिगा आणि लाकडी दांडे होते. त्यामुुळे घाबरलेल्या पर्यटकांनी आपली क्वॉलीस व व्हॅगेनर कार न थांबविता सुसाट सोडली. मात्र, मनात राग खदखदत असलेल्या स्थानिक युवकांच्या टोळक्याने टाटा सुमो व इवॉन ह्युंडाई कारने पर्यटकांचा पाठलाग सुरू केला. एखाद्या चित्रपटाला शोभावा असा जवळपास दहा किलोमीटरपर्यंत पाठलागाचा थरार सुरू होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सारेच भांबावून गेले. यावेळी काही ग्रामस्थांनी पर्यटकांना टोळक्याच्या तावडीतून सोडवित स्थानिक युवकांना चोप दिला. मात्र, गर्दीचा फायदा घेत ते पळून जाण्यात यशस्वी ठरले.
ग्रामस्थांची पोलीस ठाण्यात धाव
ग्रामस्थांनी तत्काळ पर्यटकांना घेत पोलीस ठाण्यावर धाव घेतली. मात्र, त्याचबरोबर मांगेलीमधील बेशिस्तीवर वचक नसल्याचा आरोप करीत पोलिसांना धारेवरदेखील धरले.
राजस्थानी कामगारांचाही सहभाग
गोवा येथील पर्यटकांना मारहाण करणाऱ्या स्थानिक युवकांच्या टोळक्यात काही राजस्थानी कामगारांचाही सहभाग होता. (प्रतिनिधी)
दंगलसदृश परिस्थिती
दोडामार्ग बाजारपेठेत अचानक तुफान हाणामारी झाल्याने बाजारपेठेत असलेल्या महिला व नागरिकांची स्वत:चा जीव वाचविण्यासाठी धावपळ उडाली. किंकाळ्या आणि आरडाओरडीमुळे बाजारपेठेत दंगलसदृश परिस्थिती
निर्माण झाली.
अर्धा तास वाहतूक कोंडी
एखाद्या चित्रपटाला शोभेल असा फिल्मी स्टाईल थरार दोडामार्गच्या बाजारपेठेत घडल्याने एकच धावपळ उडाली. त्यामुळे बाजारपेठेत अर्ध्या तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली.
पोलीस उशिरा दाखल
बाजारपेठेत हाणामारीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची कल्पना पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहोचले. मात्र, तोपर्यंत उशीर झाल्यामुळे हल्लेखोर पसार झाले होते.
महिलांची संरक्षणासाठी धावाधाव
अचानक उद्भवलेल्या या प्रकारामुळे स्वत:च्या संरक्षणासाठी एकच धावपळ उडाली. किंकाळ्यांच्या आक्रोशात बाजारपेठ बुडाली असताना महिलांनी मिळेल तो आसरा घेतला. कोणी दुकानात, तर कोणी चहाच्या टपरीवर जाऊन लपून बसले. भाजी नेण्यासाठी आलेली एक महिला तर बाजारपेठेतच चक्कर येऊन पडली.