हल्लेखोर पाठीमागून आले अन् साहेबांवर गोळीबार केला...

By admin | Published: March 16, 2015 02:31 AM2015-03-16T02:31:21+5:302015-03-16T02:31:21+5:30

उमा पानसरे व तपास अधिकारी अंकित गोयल यांनी रविवारी सकाळी ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनास्थळाची पाहणी केली.

The attacker came back and fired at Saheb ... | हल्लेखोर पाठीमागून आले अन् साहेबांवर गोळीबार केला...

हल्लेखोर पाठीमागून आले अन् साहेबांवर गोळीबार केला...

Next

कोल्हापूर : उमा पानसरे व तपास अधिकारी अंकित गोयल यांनी रविवारी सकाळी ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी गोयल यांनी ‘आई, तुम्हाला काही आठवतंय का?’ अशी विचारणा केली असता, ‘हल्लेखोर पाठीमागून आले आणि साहेबांवर गोळीबार केला. त्यानंतर आपण बेशुद्ध पडल्याने पुढचे काही आठवत नाही,’ असे उमा पानसरे यांनी सांगितले.
पानसरे दाम्पत्यावर १६ फेब्रुवारी रोजी सकाळी गोळीबार झाला. त्यामध्ये अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचा २० फेब्रुवारी रोजी उपचार सुरू असताना मुंबईत मृत्यू झाला. या प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या त्यांच्या पत्नी उमा या रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतल्या आहेत. त्यांच्या जबाबावर तपासाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे गोयल यांनी रविवारी सुमारे अर्धा तास त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
शनिवारी त्या थेट वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलल्याने पोलीस प्रशासनाची धांदल उडाली. अपर पोलीस अधीक्षक गोयल यांनी शनिवारी रात्री ८च्या सुमारास त्यांची घरी भेट घेतली. मारेकऱ्यांची रेखाचित्रे दाखविली असता त्यांनी त्यावर कोणतेच उत्तर दिले नाही. आपण हास्यक्लबमध्ये जाऊन आल्यानंतर हल्ला झाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. सुमारे दीड तास ते त्यांच्याकडून माहिती घेत होते.
त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा गोयल यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या घरापासून काही अंतरावरच हल्ला झाला, ते घटनास्थळ उमा पानसरे यांना दाखविण्यात आले. या वेळी त्यांना व्हीलचेअरवरून घटनास्थळी आणण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचे जावई बन्सी सातपुते, मुलगी स्मिता, सून मेघा, नातू कबीर व मल्हार, दिलीप पवार व मिलिंद यादव होते. (प्रतिनिधी)

Web Title: The attacker came back and fired at Saheb ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.