बनावट नोटा पुरविणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2017 03:54 AM2017-01-24T03:54:32+5:302017-01-24T03:54:32+5:30
बनावट नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटच्या एका सदस्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री अटक केल्यानंतर त्याला नोटा
औरंगाबाद : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटच्या एका सदस्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री अटक केल्यानंतर त्याला नोटा पुरविणाऱ्या फेरोज अब्दुल रशीद देशमुख (२७, रा. नारेगाव, मूळ रा. अंबड, जि. जालना) याच्याही सोमवारी पहाटे मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सेंट्रल जकात नाका येथे एका हॉटेलमध्ये चहा पीत असताना दोन्ही आरोपींमध्ये या व्यवहाराची डील झाल्याचे समोर आले. फेरोजकडून दोन हजारांच्या २ बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या.
महंमद इर्शाद महमंद इसाक (२७, रा. शहाबाजार) यास रविवारी रात्री १८ बनावट नोटांसह पकडण्यात आले होते. इर्शद घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी असून तो आॅपरेशन थिएटरमध्ये काम करायचा.
इर्शादच्या म्हणण्यानुसार फेरोज त्याला नोटा पुरवीत असे. ३० हजार रुपयांच्या बदल्यात तो एक लाखांच्या बनावट नोटा देत असे.
इर्शादने आतापर्यंत दीड लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याचे आणखी काही साथीदार असावेत, असा पोलिसांना संशय आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने फेरोजला सोमवारी पहाटे नारेगाव येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आल्याचे उपनिरीक्षक जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)