कोपर्डी खटल्यातील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न; चौघांना अटक
By admin | Published: April 2, 2017 12:44 AM2017-04-02T00:44:00+5:302017-04-02T00:44:00+5:30
कोपर्डी खटल्यातील तिघा आरोपींवर जिल्हा न्यायालयाच्या आवारात शिवबा संघटनेच्या चौघा कार्यकर्त्यांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला़
अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील तिघा आरोपींवर जिल्हा न्यायालयाच्या आवारात शिवबा संघटनेच्या चौघा कार्यकर्त्यांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांच्या सतर्कतेमुळे हल्लेखोरांच्या तावडीतून आरोपींची सुटका करत हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले़ शनिवारी दुपारी ही घटना घडली़ अमोल खुने, गणेश खुने, बाबूराव वाळेकर व राजेंद्र जऱ्हाड पाटील अशी हल्लेखोरांची नावे आहेत़
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे़ शनिवारी आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना सुनावणीसाठी सकाळी साडेअकराच्या वाजेच्या सुमारास न्यायालयात आणण्यात आले होते़
सुनावणी संपल्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास न्यायालयाच्या पाठिमागील बाजूने आरोपींना पोलीस व्हॅनकडे पोलीस घेऊन जात होते़ त्याचवेळी चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या चौघांनी तिघा आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला़ खून खटल्यात नव्याने साक्षीदार केलेल्या नवनाथ पाखरे यांची शनिवारी न्यायालयात साक्ष झाली़ तर खटल्याची पुढील सुनावणी १७, १८ व १९ एप्रिल रोजी होणार आहे. (प्रतिनिधी)