शिवसेना आमदार संजय गायकवाडांची गाडी जाळण्याचा प्रयत्न; जुना वाद उफाळून येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 11:16 AM2021-05-26T11:16:15+5:302021-05-26T11:20:39+5:30
MLA Sanjay Gaikwad : शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
बुलडाणा: आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केल्या काही काळापासून चर्चेत असलेले बुलडाण्याचे शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.आ. संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांच्या जुनागाव परिसरातील वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला होता. दोन अज्ञातांनी दुचाकीवर येऊन त्यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न केला असल्याची सध्या परिसरात चर्चा आहे.
दुसरीकडे या घटनेसंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशीही आ. संजय गायकवाड यांनी संपर्क साधला असून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. त्यानंतर हे प्रकरण सध्या डीआयजीस्तरावरून हाताळण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह, श्वान पथक, ठसे तज्ज्ञांचे पथकही सकाळीच आ. गायकवाड यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांनी पाहणी केली आहे.
दरम्यान आ. संजय गायकवाड हे २६ मे रोजी पहाटे दीड वाजता मुंबईवरून बुलडाण्यात आले होते. त्यानंतर पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या वाहनाच्या इंधनाच्या टाकीजवळचा भाग अज्ञातांनी पेटवून दिला होता. या वाहनाच्या समोर व मागे ही वाहने उभी होती. आगीचा भडका उडाला असता तर परिसरातील तीन ते चार वाहनेही जळाली असती, असे आ. गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले. दुसरीकडे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनीही हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे.