अधिका-याला जाळण्याचा प्रयत्न

By admin | Published: September 24, 2014 04:54 AM2014-09-24T04:54:04+5:302014-09-24T04:54:04+5:30

कचोरे, न्यू गोविंदवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला विरोध करताना रहिवाशांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला़

An attempt to burn the officer | अधिका-याला जाळण्याचा प्रयत्न

अधिका-याला जाळण्याचा प्रयत्न

Next

कल्याण : कचोरे, न्यू गोविंदवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला विरोध करताना रहिवाशांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला़ या वेळी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहायक आयुक्त कृष्णा लेंडेकर यांच्यासह एका कर्मचाऱ्यालादेखील त्यांनी रॉकेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलीस बंदोबस्तामुळे अनुचित प्रकार घडला नाही. मंगळवारी सायंकाळी ४च्या सुमारास ही घटना घडली. यानंतर संतप्त रहिवाशांनी थेट केडीएमसी मुख्यालयावर धडक दिल्याने तणाव निर्माण झाला होता.
कचोरे परिसरात ५ खोल्यांचे अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार अनधिकृत बांधकाम विभागाकडे आली होती. त्यानुसार ड प्रभागातील संबंधित विभागाचे अधिकारी लेंडेकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी जाऊन कारवाई सुरू केली़ ही कारवाई सुरू असताना तेथे जमलेल्या सुमारे २०० ते ३०० रहिवाशांनी त्यांना विरोध केला. त्यानंतरही पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरूच राहिल्याने ज्या बांधकामावर कारवाई करण्यात येत होती, तेथील फिरोज शेख आणि त्याच्या कुटुंबाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला़ याच वेळी कारवाई करणारे अधिकारी लेंडेकर यांच्यासह एका कर्मचाऱ्याच्या अंगावरदेखील संतप्त जमावाने रॉकेल ओतून त्यांना पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अधिकाऱ्यांनी बचावात्मक पवित्रा घेत तेथून काढता पाय घेतल्याने संभाव्य दुर्घटना टळली.
दरम्यान, संतप्त रहिवाशांनी यानंतर केडीएमसी मुख्यालयावर धडक देऊन अनधिकृत बांधकामविरोधी विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांना कारवाईसंदर्भात जाब विचारला़ कोणतीही नोटीस न बजावता केलेली ही कारवाई चुकीची असून, झालेले नुकसान भरून द्या, अशी मागणी केली. यावर संबंधित बांधकाम अनधिकृतच असून बांधकाम परवानगीची कागदपत्रे असतील तर सादर करा, अन्यथा नुकसानभरपाई मिळणार नाही, असे उपायुक्त पवार यांनी स्पष्ट केले. या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: An attempt to burn the officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.