दुष्काळाचे इष्टापत्तीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करु - मुख्यमंत्री
By admin | Published: August 23, 2015 05:04 PM2015-08-23T17:04:49+5:302015-08-23T17:04:49+5:30
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा छावणी व पाण्याचे नियोजन केले असून या आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २३ - मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा छावणी व पाण्याचे नियोजन केले असून या आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दुष्काळी भागात रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
रविवारी औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी घोषणांचा पाऊसच पाडला. केंद्र सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी ५५६ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून भविष्यात आणखी निधी मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेणार असून या बैठकीत दिर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करु असे त्यांनी सांगितले. शेतक-यांना अत्यल्प दरात गहू देण्यासोबतच मनरेगाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांना रोजगार उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी स्पष्ट केले. चारा छावणी व पिण्याच्या पाण्याचे नियोजन सुरु असून मराठवाड्यातील धरणांमध्ये वरील धरणांमधून कधी पाणी सोडता येईल याचेही नियोजन सुरु असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. जिल्हाधिका-यांनी ग्रामसभा घेऊन दुष्काळी योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतक-यांना होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी सरकारी यंत्रणांना दिले आहे.