पंकजा मुंडेंचे पंख छाटण्याचे प्रयत्न, एकनाथ खडसे यांचा आरोप
By अतुल कुलकर्णी | Published: May 14, 2020 07:09 AM2020-05-14T07:09:01+5:302020-05-14T07:13:06+5:30
एकीकडे आम्ही ओबीसी समाजातील नेत्यांना उमेदवारी देतो असे दाखवायचे आणि दुसरीकडे जे नेते समाजावर पकड ठेवून आहेत त्यांचे पंख छाटले जात आहेत
- अतुल कुलकर्णी
मुंबई : भाजपमध्ये जाणीवपूर्वक पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न होत आहेत. माझ्यासह पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित अशा बहुजन समाज व ओबीसी नेत्यांना दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे आम्ही ओबीसी समाजातील नेत्यांना उमेदवारी देतो असे दाखवायचे आणि दुसरीकडे जे नेते समाजावर पकड ठेवून आहेत त्यांचे पंख छाटले जात आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
आपल्याला राज्यसभेच्या वेळी उमेदवारी देता येणार नाही, पण विधानपरिषदेच्यावेळी नक्की विचार करु असे सांगण्यात आले. मात्र ज्यांनी कायम भाजपला शिव्या दिल्या, आमच्या नेत्यांविषयी वाईट उद्गार काढले त्यांना उमेदवारी दिली गेली आणि जे पक्षात निष्ठावंत होते त्यांना डावलले गेल, असा दावाही खडसे यांनी केला.
भाजपमधील घराणेशाहीबद्दल खडसे म्हणाले, आपल्यावर घराणेशाहीचा आरोप होतो. पण माझ्या घरात फक्त सुनेला उमेदवारी दिली गेली. माझी पत्नी सहकार क्षेत्रातील महानंदवर आहे. जेथे भाजपचे फक्त दोन सदस्य आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते, त्यांच्या काकू शोभाताई आमदार होत्या, मंत्री होत्या, ते स्वत: मुख्यमंत्री होते, आता विरोधी पक्ष नेते आहेत, रावसाहेब दानवे आणि त्यांचे चिरंजीव, राधाकृष्ण विखे आणि त्यांचे चिरंजीव देखील सत्तेत आहेत.
खडसेंचा राग नेमका कोणावर? प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील की देवेंद्र फडणवीस यांच्यावर? पक्षात किती नाराजी आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे खडसे यांनी दिली आहेत.