सुकाणू समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2017 02:49 AM2017-06-21T02:49:25+5:302017-06-21T02:49:25+5:30
सरकारमधील मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली असताना, सोमवारी झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत झालेला केवळ १ लाखापर्यंतच कर्जमाफी देण्याचा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सरकारमधील मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली असताना, सोमवारी झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत झालेला केवळ १ लाखापर्यंतच कर्जमाफी देण्याचा निर्णय सुकाणू समितीने अमान्य केला आहे. सरकार समितीत फूट पाडत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.
१० हजारांच्या तातडीच्या कर्जासाठी जाचक अटी असल्याने शासन निर्णयाची बुधवारी राज्यात सर्वत्र होळी करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संपाच्या सुकाणू समितीचे सदस्य करण गायकर, गणेश कदम व आप्पासाहेब पुढेकर यांनी दिली. आधी सरसकट कर्जमाफी आणि आता निर्णय बदलून केवळ एक लाखापर्यंतच कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारने फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारच्या विरोधात राज्यभर ‘चले जाव’ आंदोलन छेडणार असल्याचेही गायकर व पुढेकर म्हणाले. सोमवारी सुकाणू समितीच्या ३५पैकी केवळ ८ सदस्यांनाच बैठकीला बोलाविले होते. समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे चर्चेला जायचे तर सर्वांनीच जाऊ, असा निर्णय घेत आम्ही चर्चेला गेल्यावर आम्हाला चर्चेला बसू दिले नाही, असे कदम यांनी सांगितले.