‘राष्ट्रीय सुरक्षेचा मंत्र’ उच्चारून भारद्वाज यांना अडकविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 06:02 AM2019-08-31T06:02:37+5:302019-08-31T06:02:46+5:30
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी बचावपक्षाचा युक्तिवाद
मुंबई : पुणे पोलीस ‘राष्ट्रीय सुरक्षेचा मंत्र’ उच्चारून सुधा भारद्वाज यांना शहरी नक्षलवाद प्रकरणी अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक पाहता, सुधा भारद्वाज एल्गार परिषदेला उपस्थित नव्हत्या, असा युक्तिवाद सुधा भारद्वाज यांचे वकील युग चौधरी यांनी उच्च न्यायालयात शुक्रवारी केला.
अरुण फरेरा, वेर्नोन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज यांनी उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. सारंह कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती.
सुधा भारद्वाज यांच्याविरुद्ध पोलिसांकडे थेट पुरावे नाहीत. त्यांच्या घरातून लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, मोबाइल जप्त करण्यात आला. मात्र, त्यामध्ये गुन्ह्यासंबंधी काहीही पुरावे नाहीत. एका सहआरोपीच्या संगणकात असलेल्या सुधा भारद्वाज यांची सही नसलेले पत्र आढळले. त्या पत्रावरून पोलिसांनी सुधा भारद्वाज यांना अटक केली, तसेच भारद्वाज २ जानेवारी, २०१८ रोजी नागपूर येथे महिला कॉम्रेडच्या बैठकीला उपस्थित असल्याचा आरोप पोलिसांनी केला. मात्र, कॉल डाटा रेकॉर्ड तपासल्यावर असे निष्पन्न झाले की, बैठक आयोजित केलेल्या शोमा सेन १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत होत्या, तर भारद्वाज या काळात फरिदाबाद येथे होत्या. तेथे त्या एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, असा युक्तिवाद चौधरी यांनी केला.
३१ डिसेंबर, २०१७ रोजी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेमागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. या परिषदेमध्ये चिथावणीखोर भाषणे दिल्याने दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला.
पुरावे नसताना अटक
‘भारद्वाज यांच्याविरुद्ध काहीही पुरावे नसताना त्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मंत्र मोठमोठ्याने उच्चारला तर न्यायाधीश विचार न करताच पुराव्यांवर रबरी स्टॅम्प मारतील असे पोलिसांना वाटते,’ असे चौधरी यांनी म्हटले.