दिवा रेल्वे स्थानकाजवळ घातपाताचा प्रयत्न?
By Admin | Published: January 26, 2017 05:03 AM2017-01-26T05:03:43+5:302017-01-26T05:03:43+5:30
मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील दिवा स्टेशन ते पारसिक बोगद्यादरम्यान एक मोठा अपघात मंगळवारी रात्री टळला. रुळावर सात मीटर लांबीचा आणि जवळपास ४00 किलो वजनाचा रुळाचा एक तुकडा टाकण्यात आला होता.
मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील दिवा स्टेशन ते पारसिक बोगद्यादरम्यान एक मोठा अपघात मंगळवारी रात्री टळला. रुळावर सात मीटर लांबीचा आणि जवळपास ४00 किलो वजनाचा रुळाचा एक तुकडा टाकण्यात आला होता. मात्र, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चालकाच्या निदर्शनास वेळीच ही बाब आल्याने पुढील अनर्थ टळला.
मंगळवारी रात्री १0.४0च्या सुमारास दादरच्या दिशेने येणारी मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस दिवा स्टेशनवरून पारसिक बोगद्याच्या दिशेने जात असताना, रेल्वेमार्गावर सात मीटर लांबीचा रुळाचा तुकडा पडलेला असल्याचे चालक हरेंद्र कुमार यांना दिसला. त्यांनी त्वरित गाडी थांबवून याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), लोको पायलट (चालक), गार्ड यांनी प्रवाशांच्या सहाय्याने हा तुकडा उचलून बाजूला केला आणि ट्रेन रात्री पावणेअकराच्या सुमारास पुढे रवाना झाली. याची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून यामागे घातपात घडवण्याचा उद्देश होता का, यादृष्टीने आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे. महत्वाची बाब म्हणजे, घटनास्थळी चार ते पाच अज्ञात इसमांनाचा वावर होता, अशी माहितीही रेल्वे पोलिसांच्या हाती लागली आहे.
१७ मिनिटांतच घडामोडी
रात्री १0.४0 च्या सुमारास दादरच्या दिशने जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या लोको पायलटला ही घटना दिसून आली. तत्पूर्वी येथूनच रात्री १0.२३ च्या सुमारास कर्जत लोकल रवाना झाली होती. त्यामुळे या दोन्ही ट्रेनच्या १७ मिनिटांच्या वेळेतेच काहीतरी घडल्याची शक्यता आरपीएफकडून वर्तविली जात आहे.