दिव्यातील नालेसफाईत बिले लाटण्याचा प्रयत्न, भाजपाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2017 03:46 PM2017-06-14T15:46:22+5:302017-06-14T16:18:25+5:30
दिव्यातील नालेसफाईत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत कंत्राटदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे संगनमताने कामे न करताच नालेसफाईचा
Next
>ऑनलाइन लोकमत
दिवा (ठाणे), दि. 14 - दिव्यातील नालेसफाईत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत कंत्राटदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे संगनमताने कामे न करताच नालेसफाईचा निधी लाटण्याच्या तयारीत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी दिवा शीळ मंडळाने केला आहे.
दिव्यात नालेसफाई झाल्याचा दावा प्रशासन,ठेकेदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात येत आहे,मग दिव्यातील नाल्यात गवत रुजले कसे असा सवाल भाजपाकडून विचारला जात आहे. ज्या अर्थी नाल्यामध्ये गवत रुजले आहे त्या अर्थी नाल्यातील गाळ काढण्यात आला नसल्याकडे भाजपाने लक्ष वेधले .तसेच दिव्यातील अंतर्गत गटारे साफ करण्यासाठी 15 लाखांचा स्वतंत्र निधी मंजूर झाला होता,मात्र प्रत्यक्षात शहारातील अंतर्गत गटारे साफ न केल्याने रस्त्यांवर पाणी साचण्याचा प्रकार पहिल्याच पावसात घडला असल्याकडेही भाजपाने लक्ष वेधले आहे. नालेसफाईच्या गैर व्यवहाराकडे लक्ष वेधण्यासाठी व सदर प्रकारची चौकशी करावी यासाठी भाजपाने एक दिवसीय लाक्षणिक उपोषणही केले.
रेल्वे कल्व्हाटर्स साफ करण्यासाठी 15 लाखांचा निधी मंजूर झाला मात्र महिना झाला तरी अवघे दोन रेल्वे कल्व्हाटर्स साफ झाले नसल्याने कामे न करता परस्पर निधी लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप भाजपा कल्याण-डोंबिवली जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी केला आहे.
यंदा दिव्यातील नालेसफाईसाठी 55 लाखांचा निधी,मात्र परिस्थिती जैसे थे...
यंदा दिवा विभागातील नालेसफाई साठी एकूण 55 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला.यामध्ये 15 लाख अंतर्गत गटारे,15 लाख रेल्वे कल्व्हाटर्स,आणि 25 लाख नालेसफाई असा निधी मंजूर झाला.प्रत्यक्षात दिव्यातील अनेक नाल्यांमध्ये गाळ अजूनही तसाच असून अनेक अंतर्गत नाले साफ करण्यात आले नसल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
-दिव्यातील नालेसफाईत कंत्राटदार,स्थानिक नगरसेवक,आणि अधिकारी यांचा हातसफाई चा प्रयत्न होत आहे,सर्व सामान्य दिवेकरांच्या आरोग्याशी खेळलं जात आहे.यात गैर व्यवहार करणाऱ्यां अधिकारी आणि ठेकेदारावर फोउजदारी केस करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत.
-शिवाजी आव्हाड,स्थानिक नेते
भाजप,कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा