मला समाजकारण आणि राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न; बीडच्या घटनेतील आरोपांवर धनंजय मुंडेंचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 17:34 IST2024-12-26T17:31:34+5:302024-12-26T17:34:56+5:30

एखाद्याला सकाळी-सकाळी माझ्याविरोधात बोलल्याशिवाय त्यांची सकाळच होत नाही, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी नाव न घेता भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.

Attempt to remove me from social work and politics Dhananjay Munde statement on the allegations in the Beed murder case | मला समाजकारण आणि राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न; बीडच्या घटनेतील आरोपांवर धनंजय मुंडेंचं वक्तव्य

मला समाजकारण आणि राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न; बीडच्या घटनेतील आरोपांवर धनंजय मुंडेंचं वक्तव्य

Dhananjay Munde ( Marathi News ) : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून विविध नेत्यांनी लक्ष्य केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडत विरोधकांवर पलटवार केला आहे. माझ्यावर विविध आरोप करून मला समाजकारण आणि राजकारणातून उठवण्याचा काही लोकांचा उद्देश आहे, असा हल्लाबोल मुंडे यांनी केला आहे.

बीड हत्याकांडावर आपली भूमिका स्पष्ट करताना धनंजय मुंडे म्हणाले की, "संतोष देशमुख यांची ज्यांनी कोणी निर्घृण हत्या केली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आरोपी फासावर गेले पाहिजेत. कारण तो माझ्या जिल्ह्यातील सरपंच होता. त्यांच्याबद्दल मलाही आदर होता. जे कोणी आरोपी असतील, ते कोणाच्याही जवळचे असतील, अगदी माझ्याही जवळचे असतील तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. फक्त राजकारणापोटी माझ्यावर होत असलेले आरोपांमागील राजकारण आपण समजू शकता," असा टोला मुंडे यांनी लगावला आहे.

धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर दोन कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल असून ते फरार आहेत. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "वाल्मिक कराड यांच्यावर दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचीही पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. वाल्मिक कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे होते, ते माझ्या जवळचे तर आहेतच. त्यामुळे शासन कोणालाही पाठीशी घालत नाही. पण एखाद्याला सकाळी-सकाळी माझ्याविरोधात बोलल्याशिवाय त्यांची सकाळच होत नाही," असं म्हणत धनंजय मुंडे यांनी नाव न घेता भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, "मीडिया ट्रायल घेऊन माझी बदनामी केली जात आहे. मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले जात होते, नंतर खातं मिळू नये आणि आता बीडचं पालकमंत्रिपद मिळू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बीडच्या घटनेत चौकशी गतीने सुरू आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपींना शिक्षा मिळावी," असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.
 

Web Title: Attempt to remove me from social work and politics Dhananjay Munde statement on the allegations in the Beed murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.