"मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न", गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 12:11 PM2022-05-15T12:11:33+5:302022-05-15T12:12:09+5:30
"मुंबईला तोडण्याचे प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही"- उद्धव ठाकरे
नांदेड: येत्या काही महिन्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. यात सर्वात महत्वाची असणाऱ्या मुंबई महापालिकेवर सर्वच पक्षांचा डोळा आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. दरम्यान, काल बीकेसी मैदानात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून मुंबईला वेगळं केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्याला आता स्वतः गृहमंत्र्यांनी दुजोरा दिला आहे.
"मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न"- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील#dilipwalsepatilpic.twitter.com/huAoD7NKSn
— Lokmat (@lokmat) May 15, 2022
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलनांदेड दौऱ्यावर आले आहेत. यावेळी माध्यमांनी त्यांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांबाबत विचारणा केली. त्यावर वळसे पाटील म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या राज्यात कारवाया सुरू आहेत, त्यावरून महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न दिसतोय," असा आरोप दिलीप वळसे पाटील यांनीही केला.
उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
काल मुंबईतील बीकेसी मैदानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी गदाधारी हिंदुत्वावरुन आम्हावर टिका केली. आमचं हिंदुत्व हे गधादारी होतं, तो गधा आम्ही आता सोडून दिलाय. आमच्यासोबत असलेले हे गाढवं होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला गाढवं असे संबोधले. 1 मे च्या सभेत देवेंद्र फडणवीस मुंबई स्वतंत्र करणार असं म्हणाले. मात्र, ही मुंबई आम्हाला आंदण म्हणून मिळाली नाही. त्यामुळे, या मुंबईला तोडण्याचे प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.