विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 03:06 AM2018-07-04T03:06:02+5:302018-07-04T03:08:48+5:30
राज्य विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असून प्रमुख पक्ष त्यासाठी अनुकूल असल्याचे चित्र आहे.
मुंबई : राज्य विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असून प्रमुख पक्ष त्यासाठी अनुकूल असल्याचे चित्र आहे.
सूत्रांनी सांगितले की स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही निवडणूक बिनविरोध व्हावी या मताचे आहेत. कारण निवडणूक झाली तर घोडेबाजार होणार हे उघड आहे. निवडणुकीतील हा घोडेबाजार टाळावा म्हणून पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनीही विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्यावर भर दिला होता. तोच पायंडा फडणवीस यांनीही कायम राखला आहे.
निवडणूक बिनविरोध झाल्यास भाजपाच्या पाच, शिवसेनेच्या दोन, काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून येईल. अकरावी जागा ही शेकापचे जयंत पाटील लढतील आणि सर्वपक्षीय संबंधांचा फायदा घेत तेही बिनविरोध निवडून येतील, असे मानले जात आहे.
जयंत पाटील हे राष्ट्रवादीला पाठिंब्याची भूमिका घेतात. रायगड आणि आसपासच्या भागात भाजपा आणि शिवसेनेसाठी हे धोक्याचे आहे. त्यामुळे भाजपाने सहावा उमेदवार द्यावा आणि कसेही करून जयंत पाटील यांना पराभूत करावे, असा एक प्रवाहदेखील भाजपात आहे.
काँग्रेसने शरद रणपिसे आणि मिर्झा वजाहत अख्तर यांना तर राष्ट्रवादीने बाबा जानी दुर्रानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेकडून अनिल परब यांना पुन्हा संधी दिली जाईल पण दुसरे नाव उद्या जाहीर केले जाईल. मिलिंद नार्वेकर यांना संधी दिली जाण्याची शक्यता कमीच आहे. भाजपाकडून विद्यमान मंत्री रासपाचे नेते महादेव जानकर आणि भाई गिरकर यांचे नाव नक्की आहे. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे नाव चर्चेत होते मात्र त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, ऐनवेळी भाजपात आणून एखाद्या नेत्याला उमेदवारी दिली जाऊ शकते.