५० हजारांची लाच घेताना प्रकल्प अधिकारी अटकेत
By admin | Published: March 15, 2017 09:36 PM2017-03-15T21:36:55+5:302017-03-15T21:36:55+5:30
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पुरवठा केलेल्या वस्तूंच्या बिलाच्या मंजुरीसाठी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी
नाशिक : आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पुरवठा केलेल्या वस्तूंच्या बिलाच्या मंजुरीसाठी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी ५० हजार रुपये घेणारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी भिला शंकर देवरे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि़१५) दुपारी सापळा लावून रंगेहाथ पकडले़ या प्रकरणामुळे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सुरू असलेल्या टक्केवारीवर प्रकाश पडला आहे़
आदिवासी विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना नित्योपयोगी वस्तूंचा (साबण, खोबरेल तेल आदि) पुरवठा करण्याचे काम एका संस्थेकडे आहे़ या संस्थेच्या व्यवस्थापकांनी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पुरवठा केलेल्या वस्तूंचे ३० लाख ५९ हजार रुपयांचे बिल आदिवासी विकास भवन कार्यालयातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर केले होते़ सहायक प्रकल्प अधिकारी भिला देवरे यांची संस्थेच्या व्यवस्थापकांनी बिलाच्या मंजुरीसाठी भेट घेतली असता बिलाच्या एकूण रकमेच्या पाच टक्के अर्थात १ लाख ५० हजार रुपयांची लाचेची देवरे यांनी मागणी केली़
याबाबत पुरवठादार संस्थेच्या व्यवस्थापकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीवरून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी सापळा लावला होता़ प्रकल्प अधिकारी देवरे यांनी व्यवस्थापकाकडे तडजोडीअंती ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम घेताच रंगेहाथ पकडण्यात आले़ दरम्यान, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी संशयित प्रकल्प अधिकारी भिला देवरे यांच्याविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अटक केली आहे़