महिला विकासासाठी सर्व स्तरातून प्रयत्न
By admin | Published: January 16, 2017 05:35 AM2017-01-16T05:35:28+5:302017-01-16T05:35:28+5:30
समाजाच्या प्रत्येक घटकाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचा सूर भटक्या विमुक्तांच्या संमेलनातील परिसंवादात उमटला.
नाशिक : जग आधुनिक तेच्या दिशेने वाटचाल करीत असताना विमुक्त जाती, भटक्या जमातींमधील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक, आरोग्य, आहाराविषयीच्या ज्ञानाचा अभाव असून, महिलांच्या विकासासाठी शासन आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न होत असले तरी ते तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याने समाजाच्या प्रत्येक घटकाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचा सूर भटक्या विमुक्तांच्या संमेलनातील परिसंवादात उमटला.
संमेलनात दुसऱ्या दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईतील विधी अधिकारी अॅड. ज्योती भारती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात प्रा. सुनीता पाटील, ज्योती दुबे, वंदना उगले व कविता मानकर यांनी विचार मांडले. तळागाळातील महिलांपर्यंत शिक्षणासोबतच आरोग्य शिक्षण, आहार आदी विषयांची माहिती पोहोचण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
रघुनाथ राठोड यांनी सरकारने भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावा, भाऊसाहेब भारती यांनी समाजातील स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र विभाग असावा, प्रा. डी. के. गोसावी यांनी भटक्या विमुक्तांसाठी निवारा हक्क मान्य करावा, मधुकर गिरी यांनी समाजातील मुला-मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे, असे ठराव संमेलनात मंजूर करण्यात आले.
मनीषा राव, गुरुनाथ पेढारकर, सुंदर डांगे, डॉ. रामनाथ वाढे, दत्तात्रय बैरागी, निर्मिती वैद्य, प्रियंका सानप, पापालाल पवार, प्रीतेश बैरागी, भटके विमुक्त संघर्ष परिषद, संघर्ष वाहिनी संस्था यांना भटके विमुक्त भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अॅड. सुदाम सांगळे, पांडुरंग आंधळे व एन. एम. आव्हाड यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)