‘राम मंदिर’ आंदोलनाच्या आडून संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 05:57 AM2018-11-26T05:57:46+5:302018-11-26T05:58:18+5:30
संविधान बचाव रॅलीतील सूर : ‘मोदी हटाव देश बचाव’चा नारा
मुंबई : राम मंदिरापेक्षा रोटी, कपडा आणिं मकान महत्त्वाचे आहे. राम मंदिराचा मुद्दा पुढे करून सरकार आपले अपयश लपविण्याच्या प्रयत्न करत आहे. राम मंदिर आंदोलनाच्या आडून संविधानावरच घाला घालण्यात येत असून याविरोधात देशातील युवकांनी सज्ज राहावे, असे आवाहन संविधान बचाव रॅलीत सहभागी झालेल्या युवानेत्यांनी केले.
‘युनायटेड युथ फ्रंट’च्या माध्यमातून देशातील १४ प्रमुख राजकीय युवा संघटनांनी रविवारी संविधान पालखी काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राहिलेल्या राजगृह ते चैत्यभूमीदरम्यान निघालेल्या या पालखीत कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. ‘हम सब एक है...इन्कलाब जिंदाबाद...लाठीकाठी खायेंगे संविधान बचायेंगे...मोदी हटाव देश बचाव, अशा घोषणा देत निघालेल्या या रॅलीचे चैत्यभूमीत सभेत रूपांतर झाले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करताना कन्हैया कुमार म्हणाले की, सरकारचे अपयश लपविण्यासाठी राम मंदिराचे आंदोलन पुढे केले जात आहे. राम मंदिर आंदोलनामुळे देशातील संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे घराघरात जाऊन संविधान धोक्यात असल्याचे सांगावे लागणार आहे. घराघरात ही माहिती पोहोचवून जातीवादी व मनुवादी सरकारला बाहेर फेकण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन कन्हैयाकुमार यांनी केले. या देशातील हिंदूही धोक्यात नाही आणि मुस्लीमही धोक्यात नाही. धोक्यात आहे ते संविधान, असेही कुमार यांनी सांगितले.
आता मंदिर आणि मशिदीची चर्चा सुरू झाली आहे. जेव्हा भाजपा सरकार तुमच्याकडे हा विषय काढेल तेव्हा तुम्ही त्यांना रोजगाराचे आणि अच्छे दिनाचे प्रश्न विचारा. आज देशाचे संविधान धोक्यात आले असून सजग नागरिक म्हणून संविधान वाचवण्यासाठी एक व्हा, असे आवाहनही आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केले. तर, देशाचे संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगतानाच त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला लागली तरी त्यासाठी आपण तयार राहायला हवे, असे आवाहन पाटीदार समाजाचे युवानेते हार्दिक पटेल यांनी या वेळी केले.