कोल्हापुरात शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Published: February 14, 2017 03:48 AM2017-02-14T03:48:35+5:302017-02-14T03:48:35+5:30
दहा वर्षांपासून वेतन न मिळाल्याने वैतागलेल्या शिक्षकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन सोमवारी आत्मदहनाचा प्रयत्न
कोल्हापूर : दहा वर्षांपासून वेतन न मिळाल्याने वैतागलेल्या शिक्षकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन सोमवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
नामदेव शंकर कांबळे असे त्यांचे नाव आहे. कांबळे हे मठगांव (ता. भुदरगड) येथील मौनी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमंत क्षात्र जगद्गुरू विद्यालयात शिक्षक आहेत. जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग व संस्थाचालकांचे संगनमत असल्यानेच दहा वर्षांपासून मला पगार मिळालेला नाही असे कांबळे यांचे म्हणणे होते. शिक्षण विभागात खेटे घालून ते वैतागले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कांबळे हे आपली पत्नी वंदना व मुलगीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले. सोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेऊन ते पळत सुटले. पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)