देशामध्ये धर्माचे राज्य आणण्याचा प्रयत्न:निखिल वागळे यांचा आरोप
By admin | Published: February 21, 2017 12:32 AM2017-02-21T00:32:28+5:302017-02-21T00:32:28+5:30
विचारांची लढाई पुढे नेण्याचा निर्धार; जगभर हुकूमशाहीचा नंगानाच : गणेशदेवी
कोल्हापूर : देशात सध्या अघोषित आणीबाणी आहे. ती संविधानाला चूड लावल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधाऱ्यांचा अजेंडा पाकिस्तानसारखे धर्माचे राज्य आणण्याचा आहे, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सोमवारी येथे दिला. पानसरे-दाभोलकर यांचे मारेकरी कुणी असले तरी त्यामागील मेंदू हा सनातनी होता, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येला सोमवारी दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समिती आणि डाव्या संघटनांच्यावतीने शाहू स्मारक भवनात ‘असहिष्णुतेचे राजकारण’ या विषयावर वागळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक, पद्मश्री गणेशदेवी होते.
व्यासपीठावर दिलीप पवार, डॉ. मेघा पानसरे, लेखक विनीत तिवारी, हमिद दाभोलकर, उमेश सूर्यवंशी उपस्थित होते. सुशील शिंदे व अभिषेक मिठारी यांनी काढलेल्या शिवचरित्रकार कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती विशेषांकाचे प्रकाशन झाले. निखिल वागळे यांनी पानसरे यांची ‘ग्रेट भेट’ अंतर्गत घेतलेल्या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. व्याख्यान ऐकण्यासाठी सभागृह खचाखच भरले होते. यावेळी श्रीमती उमा पानसरे, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, सरोज पाटील, डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. शरद नावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुमारे तासभराच्या भाषणात वागळे यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त केली व कितीही मेले तरी विचार मरू देता कामा नये. आपण ही विचारांची लढाई तितक्याच खंबीरपणे पुढे नेऊया, असा निर्धार व्यक्त केला. त्यास सभागृहाने टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
वागळे म्हणाले, उजव्या विचारसरणीच्या संस्थांना विचार मांडण्याचा अधिकार आहे मात्र खून करण्याचा नाही, मग ती कोणतीही संस्था असो. त्यांनी पेरलेल्या विषवल्लीमुळे खुनी तयार होतात. झाकीर नाईकच्या ‘इस्लामिक रिसर्च फौंडेशन’वर जर सरकार बंदीची कारवाई करत असेल तर मानवी मेंदूवर विघातक परिणाम करणारे ड्रग सापडतात त्या आश्रमावर कारवाई का होत नाही. गणेशदेवी म्हणाले, ‘जगभर हुकुमशाहीचा नंगानाच सुरू आहे. प्रश्न विचारण्याची किमत मोजावी लागत आहे.’
हमीद दाभोलकर म्हणाले, ‘मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना त्याचवेळी अटक झाली असती तर आज तीन जीव वाचले असते.’ विनीत तिवारी म्हणाले, ‘व्यक्ती गेल्याने पुरोगामी चळवळ थांबत नाही, पण आता एका व्यक्तीलाही गमावण्याची आमची तयारी नाही.’ प्रास्ताविकात प्रा. मेघा पानसरे म्हणाल्या, विचारवंतांचे एकापाठोपाठ एक खून होऊन वर्षे उलटत आहेत तरी पोलिसांना फरार आरोपींना पकडता आलेले नाही. कडेकोट पोलिस बंदोबस्तात ही सभा घ्यावी लागते यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. उमेश सूर्यवंशी यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.
नांगरे-पाटील यांची प्रतिमा..
वागळे यांनी या कार्यक्रमात सुरुवातीलाच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर बोचऱ्या शब्दांत कडक ताशेरे ओढले. रविवारी त्यांचे कागलमध्ये ‘आजची प्रसारमाध्यमे’ या विषयांवर व्याख्यान असताना कागल पोलिसांनी त्यांना ‘सामाजिक स्वास्थ बिघडेल असे विधान केल्यास कारवाई करण्याची नोटीस दिली’ तशी नोटीस कोल्हापुरातील सोमवारच्या कार्यक्रमाचे आयोजक दिलीप पवार व मेघा पानसरे यांनाही दिली होती. प्रवेशद्वारावर बंदोबस्त होता. व्यासपीठाजवळही पोलिस अधिकारी व्याख्यान होईपर्यंत थांबून होते.
त्याचा संदर्भ घेत वागळे म्हणाले,‘पोलिसांना एवढीच मर्दुमकी दाखवायची असेल तर पानसरे, दाभोलकर यांच्या खुन्यांना पकडून दाखवा. ते मोकाट फिरत आहेत आणि तुम्ही आम्हाला नोटीस बजावता आहात हा कुठला न्याय आहे..? कोल्हापुरात विश्वास नांगरे-पाटील यांच्यासारखा संवेदनशील अधिकारी आहे. त्यांनी यात लक्ष घालावे अन्यथा त्यांच्याविषयीची आमच्या मनात असलेली प्रतिमा कलंकित झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचवेळी सभागृहातून ‘ती झाली आहेच..’ अशी प्रतिक्रिया उमटली व त्यास लोकांनी प्रतिसाद दिला.
पुतळे फोडून...
राम गणेश आगरकर यांनी संभाजी महाराज यांच्यासंबंधी लिहिलेला इतिहास चुकीचा असेल, तो तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही नवा खरा इतिहास लिहा परंतु पुतळे फोडून विचार बदलता येत नाही, असे वागळे यांनी सांगितले. गडकरी प्रकरणावर कोल्हापूरचे तरुण इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी उत्तम लेखन केले. दलित साहित्याचा हुंकार जो उमटला तो मारामारीने नव्हे, तर त्या समाजातील नवी पिढी लिहीत झाल्याने हे लक्षात घ्या. पुतळे फोडून दहशत निर्माण होते व हीच दहशत असहिष्णुतेला कारणीभूत ठरत आहे, असे त्यांनी सांगितले.
मेघा व हमिद यांची लढाई कौतुकास्पद
दाभोलकर व पानसरे यांच्या खुन्यांना शिक्षा व्हावी यासाठी मेघा पानसरे व हमिद दाभोलकर हे सहनशीलतेने करत असलेली लढाई कौतुकास्पद असल्याचे वागळे यांनी सांगितले. या खटल्याची सुनावणी सत्यरंजन धर्माधिकारी यांच्यासारख्या सत्यशील न्यायाधीशांकडे असल्याने आपल्याला न्याय मिळेल, अशी आशा वाटते. या प्रकरणात अॅड. अभय नेवगींसारखे वकील प्रामाणिकपणे झगडत असल्याचे वागळे यांनी सांगितले.
एक चोर गेले.. दुसरे आले
दोन्ही काँग्रेसवाले कितीही पुरोगामीपणाचा टेंभा मिरवत असले तरी त्यांना त्या विचारांशी कांहीच देणेघेणे नव्हते. राज्यात सत्तांतर झाले परंतू गुणात्मक कांहीही फरक जाणवत नसून एक चोर गेले व दुसरे चोर सत्तेत आले असा अनुभव लोकांना येत असल्याचे वागळे यांनी सांगितले.