किल्ले शिवनेरीचा जागतिक वारसामध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार - डॉ. शिखा जैन
By admin | Published: May 28, 2016 06:02 PM2016-05-28T18:02:01+5:302016-05-28T20:43:48+5:30
छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा म्हणून समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या सदस्या डॉ. शिखा जैन यांनी केले
Next
>ऑनलाइन लोकमत -
जुन्नर, दि. 28 - छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले प्रेरणास्थान असून, या गडकिल्ल्यांची महती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी व या गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा म्हणून समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या सदस्या डॉ. शिखा जैन यांनी केले.
महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकार सांस्कृतिक मंत्रालय सल्लागार व जागतिक वारसास्थळ समिती तसेच भारत सरकार स्मारक प्राधिकरणाची टीम महाराष्ट्र दौ-यावर असून या टीमने आज शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर येथील किल्ले शिवनेरीला भेट दिली. या वेळी राज्याचे शिक्षण तथा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, युवराज संभाजीराजे, भारत सरकारच्या स्मारक प्राधिकरणाच्या सदस्या व राजस्थानच्या इतिहासकार डॉ. रीमा हुजा, आमदार शरद सोनावणे, प्रांताधिकारी कल्याण पांढरे, तहसीलदार आशा होळकर, वनपरिक्षेत्र अधिकारी जयंत पिसाळ, भाजपाचे शहराध्यक्ष नंदकुमार तांबोळी, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष केरभाऊ ढोमसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पोहेकर यांच्यासह शिवप्रेमी व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विनोद तावडे म्हणाले, ‘‘गडकिल्ल्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्यास पर्यटनाला मोठा वाव मिळेल. सर्वांनी एकत्रित येऊन गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची माहिती, ऐतिहासिक महत्त्व, लिखाण, पुरावे याबाबतची माहिती संकलित करून त्यांची जागतिक वारसा म्हणून नोंद होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
युवराज संभाजीराजे म्हणाले, ‘‘जगाच्या इतिहासात अजरामर असलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांत समावेश करून केंद्र सरकारद्वारे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून या किल्ल्यांना वैभव प्राप्त करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. या वेळी या समितीला किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मस्थळ, शिवजन्मस्थळावरून दिसणाºया मानमोडी लेणी, गणेश लेणी, तुळजाई लेणी, हमामखाना, गडावरील जलव्यवस्थापन, खापरी पाईपलाईन, चुन्याचा घाणा, जुन्नर तालुक्यातील जैवविविधता आदींबाबत शिवाजी ट्रेलचे जुन्नर आंबेगाव व खेड संवर्धन समितीचे अध्यक्ष विनायक खोत यांनी माहिती दिली.