पालिकेत घुसण्याचा प्रयत्न

By admin | Published: August 12, 2014 02:47 AM2014-08-12T02:47:11+5:302014-08-12T02:47:11+5:30

मुंबईतील खड्डे आणि पालिका आस्थापनांतील गैरसोयींविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी सोमवारी मुंबई युवा काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला

Attempts to infiltrate | पालिकेत घुसण्याचा प्रयत्न

पालिकेत घुसण्याचा प्रयत्न

Next

मुंबई : मुंबईतील खड्डे आणि पालिका आस्थापनांतील गैरसोयींविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी सोमवारी मुंबई युवा काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलकांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला. त्यात काही कार्यकर्ते जखमी झाले.
दरम्यान, मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांना शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक जबाबदार असल्याचा आरोप करत युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई मनपा मुख्यालयावर धडक मोर्चा काढला. या वेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिसांसोबत झालेल्या वादावादीनंतर आंदोलकांना रोखणाऱ्या पोलिसांनी मोर्चावर लाठीचार्ज केला.
याबाबत प्रतिक्रिया देताना मुंबई युवा काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव म्हणाले, ‘शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी ठेकेदारांसोबत भ्रष्टाचार करून मुंबईला खड्ड्यात घातले आहे. ठेकेदारांशी संगनमत करून नगरसेवकांनी रस्त्यांच्या कंत्राटात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्याचा त्रास सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. याचाच जाब विचारण्यासाठी युवा काँग्रेसने आज महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांना हाताशी घेऊन महापालिका प्रशासनाने आंदोलकांवर लाठीचार्ज केला.’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महापालिका मुख्यालयाबाहेर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनाही आंदोलकांनी धक्काबुक्की केली. तरीही शांततेचे आवाहन करणाऱ्या पोलिसांवर काही आंदोलकांनी हातात असलेल्या झेंड्याच्या काठ्या भिरकावल्या. परिणामी, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला.’ (प्रतिनिधी)

Web Title: Attempts to infiltrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.