CoronaVirus News: मोठी बातमी! नागपूरचे ऑक्सिजन टँकर्स गुजरातला नेण्याचा प्रयत्न उधळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 05:27 PM2021-05-07T17:27:11+5:302021-05-07T17:38:28+5:30
CoronaVirus News: व्यवसायिक प्यारे खान यांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला; टँकर्स पुन्हा नागपूरला रवाना
नागपूर: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून दररोज जवळपास ६० हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील परिस्थिती गंभीर आहे. रेमडेसिविर, ऑक्सिजन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रेमडेसिविर आणि ऑक्सिजनसाठी प्रशासकीय पातळीवर काम सुरू आहे. अशा परिस्थितीत नागपुरात येत असलेले ऑक्सिजन टँकर्स गुजरातला पळवण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र एका व्यवसायिकानं दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न उधळला गेला.
सीरमच्या कोविशील्डबद्दल मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार; लसीकरणावर थेट परिणाम होणार
नागपूरला ऑक्सिजनची नितांत गरज असल्यानं अशमी ट्रान्सपोर्टचे संचालक प्यारे खान यांनी ४ टँकर्सची व्यवस्था केली. खान यांनी सीएसआरच्या माध्यमातून ऑक्सिजन टँकरची सोय केली. हे टँकर छत्तीसगडच्या भिलाईहून निघाले होते. मात्र त्यांना नागपूरला पोहोचण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागल्यानं खान यांनी ऑक्सिजन टँकर्सचा पुरवठा करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना तांत्रिक बिघाड झाल्यानं विलंब होत असल्याचं सांगितलं.
कोरोनाचा कहर सुरू असताना चीननं मोठा निर्णय घेतला; संपूर्ण जगालाच बसणार फटका?
ऑक्सिजन टँकर्स येण्यास बराच उशीर होत असल्यानं खान यांनी तातडीनं त्यांची एक टीम टँकर अडकून पडलेल्या ठिकाणी पाठवली. त्यावेळी एक धक्कादायक बाब त्यांच्या लक्षात आली. चारही टँकर्स गुजरातमधील अहमदाबादच्या दिशेनं निघाले होते. यासंदर्भात प्यारे खान यांनी ऑक्सिजन पुरवठादार कंपनीशी संपर्क साधला. मात्र त्यांनी आधी टाळाटाळ केली आणि नंतर उत्तरं देणंच बंद केलं. त्यामुळे खान यांनी सूत्रं हलवली आणि चारही टँकर्स रोखण्याचा निर्णय घेतला.
गुजरातमधून ऑक्सिजन पुरवठादार कंपनीला अधिकची रक्कम मिळत असल्यानं त्यांनी चारही टँकर्स परस्पर अहमदाबादला पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं खान यांना समजलं. या चारपैकी दोन टँकर्स औरंगाबादजवळ पोहोचले होते. तर इतर दोन टँकरही त्याच दिशेनं निघाले होते. मात्र खान यांनी चारही टँकर्स वळवायला लावले. यापैकी दोन टँकर्स नागपुरला पोहोचले असून उर्वरित २ टँकर्स थोड्याच वेळात नागपुरला पोहोचतील.