विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 06:13 AM2017-11-23T06:13:06+5:302017-11-23T06:13:18+5:30
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे ७ डिसेंबरला होणारी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाहीत हे जवळपास स्पष्ट असताना आता ही निवडणूक बिनविरोध करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे ७ डिसेंबरला होणारी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाहीत हे जवळपास स्पष्ट असताना आता ही निवडणूक बिनविरोध करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
राणे उमदेवार नसतील तर शिवसेनेचा पाठिंबा भाजपाच्या उमेदवाराला मिळविण्यात मुख्यमंत्र्यांना कोणतीही अडचण येणार नाही. शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले की भाजपाचा विजय ही केवळ औपचारिकता असेल. कारण, भाजपाचे १२२ आणि शिवसेनेचे ६३ मिळून १८५ आमदार होतात. २८८ सदस्यांपैकी १८५ मते भाजपाला मिळणार असतील तर ७ डिसेंबरच्या निवडणुकीआधीच भाजपाच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेले असेल.
अशा परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून उमेदवार देतील का हा प्रश्न आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी विधान परिषदेची प्रत्येक निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न केला होता आणि त्यात त्यांना यशही आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपा-शिवसेनेलाही विश्वासात घेतले होते. निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी आपण हा पुढाकार घेतल्याचे चव्हाण यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. त्याच धर्तीवर, यावेळी भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून यावा, असा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
भाजपाकडून सध्या तीन नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेले प्रसाद लाड, भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि शायना एनसी यांच्यापैकी एकाला संधी दिली जाईल, असे म्हटले जाते. लाड यांना संधी देऊन भंडारी वा शायना एनसी यांना डावलल्यास निष्ठावानाऐवजी उपºयांना संधी दिल्याची टीका होऊ शकते. तथापि,निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लाड यांच्या नावाला अन्य पक्षांकडून सहमती मिळू शकते.