सावधान नागरिकहो... शहरात स्वाईन फ्लू आलाय..!
By admin | Published: February 25, 2015 11:43 PM2015-02-25T23:43:05+5:302015-02-26T00:09:24+5:30
यंत्रणा सतर्क : तपासणी अहवाल येण्यास विलंब, नागरिकांचे प्रबोधन करण्याची कोणतीही यंत्रणा नाही
सचिन लाड - सांगली --देशात आणि राज्यात थैमान घातलेल्या ‘स्वाईन फ्लू’ या संसर्गजन्य आजाराने सांगलीत शिरकाव केलाय. स्वाईनची लागण झालेली एक महिला रुग्ण सापडली आणि तिचा काही तासातच मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज एक-दोन संशयित रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. खासगी रुग्णालयातही स्वाईनचे संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. सांगलीसह, कोल्हापूर जिल्हा व कर्नाटकातील संशयित रुग्ण सांगलीमध्ये उपचारार्थ दाखल होत आहेत. संशयित रुग्णांच्या घेण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत आहे.
लागण होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी...
संशयित रुग्ण किंवा स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णाजवळ (सहा फुटाच्या आत) जाऊ नये.
पौष्टिक आहार घ्यावा
भरपूर पाणी प्यावे.
हस्तांदोलन व सार्वजिनक ठिकाणी थुंकू नये.
सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांपासून दूर रहावे.
लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या सी-व्हिटॅमीन असलेल्या पदार्थांचा आहारात वापर करावा.
चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल्स यासह अन्य गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
बाहेरून जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुवावेत. कारण स्वाईन फ्लूचे विषाणू लागण झालेल्या रुग्णांच्या खोकल्यातून, शिंकांतून बाहेर पडतात. हे विषाणू टेबल, खुर्ची, एसटी बस, रेल्वे अशा आसपासच्या ठिकाणी जाऊन स्थिरावून तीन ते आठ तास जिवंत राहतात. यासाठी नाक व चेहऱ्यास हात लावण्याचे टाळावे.
काय करावे?
आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखल व्हावे.
जाताना नाका-तोंडाला रुमाल किंवा मास्क लावावा.
काळजी कोणी घ्यावी
गदोदर महिला
वृद्ध महिला व पुरुष
पाचपेक्षा कमी वयाची मुले
एचआयव्ही लागण झालेले रुग्ण
मधुमेह, दमा, हृदयविकार असणारे रुग्ण
रुग्णांनी काय करावे.
संशयित रुग्णांनी घराबाहेर पडू नये. मास्कचा वापर करावा.
रुग्णालयातून मिळणाऱ्या औषधांचा कोर्स पूर्ण करावा.
शिंकताना, खोकताना रुमाल नाका-तोंडापुढे धरावा.
घरातील फरशी, टेबल फिनेलमिश्रित पाण्याने दररोज पुसावे.
भरपूर पाणी प्यावे, व्यवस्थित आहार घ्यावा.
सर्व लक्षणे गेल्यानंतर एक दिवस घरीच थांबाबे.
स्वाईन फ्लूची शंका कधी घ्यावी?
घसा दुखणे, खोकला असेल व त्यासोबत सतत दोन दिवस शंभरच्या वर ताप असेल.
तापासोबत केव्हाही दम लागला, तर ते गंभीर लक्षण समजून तातडीने उपचारासाठी दाखल व्हावे.
मागील आठ दिवसात परदेश प्रवास झाला असेल.
स्वाईन फ्लूच्या रुग्णांशी निकटचा संपर्क आल्यास.