कुंचल्यातून ज्वलंत समस्यांकडे वेधले लक्ष; राज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 01:54 AM2019-09-13T01:54:25+5:302019-09-13T01:54:33+5:30
दोनशे स्पर्धकांचा सहभाग, तीन लाखांच्या बक्षिसांची लयलूट
देवळी : महात्मा गांधी यांच्या जयंती महोत्सवानिमित्त देवळी नगरपालिकेच्यावतीने राज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यभरातून दोनशे स्पर्धेकांनी सहभाग नोंदवित शहरातील भिंतीवर विविध सामाजिक समस्यांवर आधारीत चित्र रेखाटून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहराकरिता नाविन्यपूर्ण ठरलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील भकास भिंती आता बोलक्या झाल्या आहेत.
नगरपालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी यांच्या जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहभागी चित्रकारांनी पर्यावरण, जलसंधारण, स्वच्छ महाराष्टÑ, स्त्रीभृण हत्या व इतर ज्वलंत समस्यावरील चित्रे रेखाटून जनजागृतीही घडवून आणली. या स्पर्धेत महिला स्पर्धकांचाही मोठा सहभाग होता.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नगर भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामदास तडस यांच्यासह नगरपालिका उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, पालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, सभापती मिलिंद ठाकरे, नंदू वैद्य, मारोती मरघाडे, नगरसेवक कल्पना ढोक व विजय गोमासे यांची उपस्थिती होती. यात गुणानुक्रमे यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांवर तब्बल तीन लाख रुपयांच्या बक्षिसांची लयलूट करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.पंकज चोरे यांनी मानले.
स्पर्धेत प्रतीक प्रथम, तर सुहास तअलदिलवार दुसरा
राज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धेत नगापूरचा प्रतिक कनोजे याने प्रथम क्रमांक पटकविला. तर चंद्रपुरचा सुहास तअलदिलवार हा द्वितीय, हिंगण्याचा अतुल सहाकर तृतीय, चंद्रपूरचा सदानंद पचारे चतुर्थ, परभणीचा संतोष तलडे पाचवा, सेलूचा राकेश धवने सहावा तर आर्णीचा नौशाद शेख जावेद हा सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. श्रीपत भोगांडे , प्रकाश बनगर, आशिष पोहाणे व गजेंद्र चौधरी यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषीक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे परिक्षण कला महाविद्यालय, नागपुरचे अधिव्याख्याता प्रफुल्ल नायसे, शासकीय कला महाविद्यालय, नागपुरचे प्रफुल्ल तायवाडे व परभणीचे केशव लागड यांनी केले. चित्रांचे रेखाटन, रंगकाम, घोषवाक्य विषयाची मांडणी, योग्य उद्देश आदी निकषांवर परिक्षकांनी चित्रांचे गुणांकन केले.