सायकल हब म्हणून नवी ओळख निर्माण करणार्या नाशिकमध्ये ‘सायकल कंदील’ ठरतोय आकर्षण
By Azhar.sheikh | Published: October 19, 2017 03:06 PM2017-10-19T15:06:19+5:302017-10-19T15:43:17+5:30
एकूण धार्मिक-पौराणिक पर्यटनाकडून निसर्ग पर्यटनाकडे आणि तेथून वाईन टुरिझमकडे प्रवास करणारे 'गुलशनाबाद' अर्थात नाशिक आता सायकल हब म्हणून आपली नवी ओळख देशाच्या नकाशावर निर्माण करू पाहत आहे.
नाशिक : नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील एक पौराणिक धार्मिक वारसा लाभलेले शहर म्हणून जगभर प्रसिध्द आहे. दर बारा वर्षांनी येथील दक्षिण गंगा अर्थात गोदावरीच्या तीरावर भरणारा कुंभमेळा यामुळे हे शहर जगबर लोकप्रिय आहे. या शहराला प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणूनही ओळखले जाते. उत्तम असे पोषक- निरामय वातावरण लाभलेल्या या शहरात धार्मिक, दुर्ग, निसर्ग, धरण, पर्यटनासाठी देशभरातून नव्हे तर परदेशातूनही पर्यटक वर्षभर हजेरी लावतात. या शहराने काळानुरूप कात टाकली असून जागतिक स्तरावरील ‘रॅम’मध्ये भारताचा झेंडा मानाने पहिल्यांदा फडकाविणारे सायकलपटू डॉ. महाजन बंधू नाशिकचेच. त्यानंतर चालू वर्षी लेफ्टनंट कर्नल डॉ. श्रीनिवास गोकूलनाथ यांनी ही ‘रॅम’ जींकली. एकूण धार्मिक-पौराणिक पर्यटनाकडून निसर्ग पर्यटनाकडे आणि तेथून वाईन टुरिझमकडे प्रवास करणारे 'गुलशनाबाद' अर्थात नाशिक आता सायकल हब म्हणून आपली नवी ओळख देशाच्या नकाशावर निर्माण करू पाहत आहे.
नाशिकमध्ये सायकलिंगचे ब्रॅन्डिंग व त्याची क्रेझ अबालवृध्दांमध्ये कमालीची वाढत आहे. यासाठी शहरातील काही सायकलपटूंनी एकत्र येत ‘नााशिक सायकलिस्ट फाउण्डेशन’ ही संघटना स्थापन केली आहे. या संस्थेने नवोदित सायकलपटू घडविण्याच्या दृष्टिकोनातून चांगले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. एकूणच नाशिक-पंढरपूर वारी, नाशिक-वणी, नाशिक-इगतपूरी अशा विविध सायकलिंगच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. महात्मा गांधी जयंती ‘सायकल डे’ म्हणून घोषित व्हावी, यासाठी मागील तीन वर्षांपासून ही संस्था नाशिक-त्र्यंबकेश्वर नाशिक-मुंबई सायकल वारी गांधी जयंतीला करते. या संस्थेने नाशिकच्या अल्हाददायक वातावरण, जिल्ह्यातील धरणे, घाटमार्ग अशा भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेत सायकल चळवळ वृध्दिंगत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. नाशिकमधील कृषीनगर भागात सायकल सर्कल’ही नागरिकांचे लक्षवेधून घेत आहे. या संस्थेच्या वतीने सार्वजनिक सण-उत्सवामध्ये सायकलचे ब्रॅन्डिंग आणि सायकल चळवळ पुढे नेण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या लढविल्या जातात. कधी सायकलच्या स्पेअर्स पार्टद्वारे साकारलेला ‘सायकल गणेश’ तर या वर्षी चक्क सायकलच आकाशात लटकवून दिवाळीच्या निमित्ताने ‘सायकल कंदील’ उभारून दिपोत्सवाच्या संस्थेने नाशिककरांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तरण तलाव सिग्नल येथे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाला लागून एका मोठ्या हायड्रोलिक क्रेनच्या साहाय्याने अस्सल पारंपरिक मॉडेलची सायकल लटकवून ‘सायकल कंदिल’ लावण्यात आला आहे. यावर सस्थेचा लोगो असून दिपावलीचा शुभेच्छा संदेशही लिहिण्यात आला आहे. सध्या आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा ‘सायकल कंदिल’ शहरात चर्चेचा विषय ठरला असून अनेक तरूण-तरुणी या ठिकाणी येऊन या आगळ्या वेगळ्या ‘सायकल कंदील’सोबत सेल्फी क्लिक करताना दिसून येत आहेत.