मनमिळाऊ अन् कडक शिस्तीचे कोविंद!
By admin | Published: June 20, 2017 01:45 AM2017-06-20T01:45:30+5:302017-06-20T01:45:30+5:30
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांची घोषणा झाल्याने खऱ्या अर्थाने कोळी समाजाला न्याय मिळाला आहे.
अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांची घोषणा झाल्याने खऱ्या अर्थाने कोळी समाजाला न्याय मिळाला आहे. बिहारच्या राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही कोळी समाजबांधवांना न्याय मिळावा, म्हणून त्यांनी पत्रव्यवहार केला होता. अतिशय मनमिळाऊ स्वभाव हा त्यांचा एक महत्त्वाचा गुण मानला पाहिजे, असे मत आॅल इंडिया कोळी समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा माजी आमदार कांती कोळी यांनी व्यक्त केले.
कोविंद हे अतिशय शिस्तप्रियदेखील आहेत. मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असलेल्या कोळी समाजातील असूनही ते शुद्ध शाकाहारी आहेत. कोळी समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून लढा उभा केला आहे. ते खासदार झाले आणि आॅल इंडिया कोळी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर, त्यांनी या समाजाला मानाचे स्थान मिळावे, म्हणून विविध प्रकारे आंदोलने तसेच कार्यक्रमदेखील घेतले, असे सांगतानाच कांती कोळी म्हणाले, त्यांनीच १९८३मध्ये मला महाराष्ट्र कमिटीचा अध्यक्ष केले.
आजही मी ते पद भूषवत आहे. त्यांचे बोलणेदेखील अतिशय सोज्वळ असून, चांगल्या वृत्तीचा माणूस म्हणूनही त्यांची ओळख आहे. राज्यपाल झाल्यानंतरही आदिवासी विकासमंत्र्यांकडे त्यांनी कोळीबांधवांना महादेव कोळी हे जातप्रमाणपत्र मिळावे, म्हणून पत्रव्यवहार केला होता.
ठाण्याच्या राकेश शांतिलाल पटेल यांनी अशीच एक आठवण सांगितली आहे. कोविंद हे राज्यसभेचे खासदार असताना १९९४च्या सुमारास पटेल आणि ठाण्यातील परेश कोळी हे काही कामानिमित्त दिल्लीत पोहोचले. दिल्लीला उतरल्यावर त्यांना वाटले की, कोविंदसाहेबांनी कुणाला तरी गाडी घेऊन पाठवले असेल. परंतु, बघतात तो साक्षात तेच त्यांना न्यायला गाडी घेऊन रेल्वे स्टेशनवर आले होते. तेदेखील मारुती ८०० ही कार स्वत: चालवत. त्यांना गाडीत बसल्यावर कळले, त्या दिवशी रविवार असल्यामुळे ड्रायव्हरची रजा आहे आणि सुटीवर असलेल्या ड्रायव्हरला कशाला त्रास द्या किंवा स्नेहींना त्यांची सोय करायला कशाला सांगा, असा विचार करून स्वत: खासदारसाहेब ड्रायव्हर झाले आणि पटेल व कोळींना त्यांनी साउथ अॅव्हेन्यूला सोडले. त्यांचा तो साधेपणा व अत्यंत सरळ वागणे-बोलणे यामुळेच ते राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचतील, अशी भावना पटेल यांनी व्यक्त केली.
रामनाथ कोविंद यांनी अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे. कोळी समाजाचे प्रश्न त्यांनी जवळून पाहिले आहेत. त्यामुळे कोविंद हे राष्ट्रपती झाल्यानंतर कोळी समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवतील, अशी आशा आहे.
- गणेश वाघीलकर, अध्यक्ष, दर्यासागर बेरोजगार सहकारी सेवा संस्था, पनवेल
अमुक जातीची व्यक्ती उच्चपदी बसल्यावर लगेच न्याय मिळेल हे चुकीचे आहे; परंतु त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जाईल, एवढे मात्र निश्चित आहे.
- अॅड. जे. टी. पाटील, अध्यक्ष, अखिल कोळी समाज परिषद
कोळी समाजाकडे भरपूर नेते आहेत. मात्र, त्यांनी कधी समाजाचा फारसा विचार केला नाही. रामनाथ कोविंद यांच्या रूपाने कोळी समाजाला न्याय मिळेल, अशी आशा आहे.
- प्रकाश भगत, सदस्य, अलिबाग मच्छीमार सोसायटी
रामनाथ कोविंद यांच्यासारखा माणूस भारताच्या सर्वोच्च पदावर बसल्यास कोळी समाजाच्या प्रश्नांना नक्कीच वाचा फुटेल.
- रूपेश नाखवा, माजी अध्यक्ष, कारंजा मच्छीमार सोसायटी, उरण