Maharashtra Political Crisis: “तुम्हीही तेच केलंत, आपला तो बाब्या नी दुसऱ्याचा तो ठोंब्या होय?”; भाजपचे पवारांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 02:08 PM2022-08-24T14:08:22+5:302022-08-24T14:09:22+5:30
Maharashtra Political Crisis: राज्यातील राजकीय परिस्थिती आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरुन शरद पवारांनी भाजपवर सडकून टीका केली होती.
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते सातत्याने शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून भाजपवर हल्लाबोल केला. शरद पवारांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना, जिथे सत्ता नव्हती तिथे आणली. भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप करत अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईवर संताप व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली. ते विरोधात लिहित होते, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. अशा पद्धतीने देशात कारवाया केल्या जात आहेत. देशात सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. याला भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी पलटवार केला आहे.
आपला तो बाब्या नी दुसऱ्याचा तो ठोंब्या होय?
अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. जिथं सत्ता नव्हती तिथं आणली गेली इति शरद पवार. हेच तुम्ही तीन महिन्यांपूर्वी पर्यंत गेली अडीच वर्षे अभिमानाने सांगत होतात. आपला तो बाब्या नी दुसऱ्याचा तो ठोंब्या होय?..., असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. तत्पूर्वी, देशातील लोकांमध्ये संभ्रम आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांजवळ आज बहुमत आहे. पण हे उचित बहुमत नाही. देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही, असेही शरद पवार म्हणाले.
दरम्यान, आज हुकुमत त्यांच्या हातात आहे. जो राजकीय पक्ष किंवा नेता त्यांच्याविरोधात बोलतो त्याच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाते. अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली. त्यांच्यावर १०० कोटींचा आरोप करण्यात आला. नवाब मलिक यांची काय चूक होती? २० वर्षांपूर्वी काही व्यवहार झाला होता. दिल्लीतील उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई होत आहे. चुकीचे काम केले तर आमचे समर्थन नाही. केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयचा वापर होतोय. ईडी, सीबीआयला सोबत घेऊन सध्या काम केले जात आहे, असा दावाही शरद पवार यांनीही केला.