५२ कोटीच्या वसुलीसाठी वसंतदादाच्या मालमत्तेचा २६ रोजी लिलाव
By admin | Published: October 13, 2016 08:24 PM2016-10-13T20:24:57+5:302016-10-13T20:24:57+5:30
सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास ऊस घातलेल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या ५२ कोटीच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी महसूल विभागातर्फे दि. २६ आॅक्टोबर
ऑनलाइन लोकमत
मिरज, दि. 13 - सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास ऊस घातलेल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या ५२ कोटीच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी महसूल विभागातर्फे दि. २६ आॅक्टोबर रोजी कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. मिरजेच्या तहसीलदारांकडून जप्तीद्वारे थकीत बिलाच्या वसुलीसाठी लिलावाची अंतिम नोटीस कारखान्यास बजाविण्यात येणार आहे.
वसंतदादा साखर कारखान्याचे २०१३ व १४ च्या उसाचे ४६ कोटी ३९ लाख रुपयांचे बिल व इतर देणी शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. याबाबत शेतकरी संघटनांनी आंदोलन केले होते. या आंदोलनांमुळे कारखान्याची मालमत्ता जप्त करावी व तिच्या विक्रीद्वारे रक्कम वसूल करून शेतकऱ्यांची देणी देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले होते. १२ जुलै २०१४ रोजी महसूल विभागाने महसूल वसुली प्रक्रिया सुरू करून कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई सुरू केली. कारखान्याच्या कर्मचारी वसाहतीसह शेजारील २१ एकर भूखंडाची विक्री करून शेतकऱ्यांची देणी भागविण्याच्या कारखाना व्यवस्थापनाच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्याने, जमीन विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याने जमीन विक्री बारगळली.
जप्ती व वसुलीच्या तीन नोटिसा बजावल्यानंतरही शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाची रक्कम अद्याप वसूल झालेली नाही. त्यामुळे महसूल विभागामार्फत जमीन विक्रीसाठी वसुलीस देण्यात आलेली स्थगिती उठवून पुन्हा कारखान्याच्या सर्वच मालमत्तेवर शासनाचा बोजा चढविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. शेतककऱ्यांच्या उसाचे बिल व थकीत देणी असे ५२ कोटी रुपये वसुलीसाठी २६ आॅक्टोबररोजी कारखान्याची इमारत वगळता इतर मालमत्ता व जमिनीचा मिरजेच्या तहसील कार्यालयात लिलाव करण्यात येणार आहे.
लिलावात मालमत्तेची विक्री न झाल्यास मालमत्तेच्या सात-बारा उताऱ्यावर मालक म्हणून शासनाची नोंद करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना कारखान्याच्या मालमत्तेच्या लिलावाची नोटीस बजावण्यात येणार आहे. कारखाना कर्मचाऱ्यांची सुमारे एक कोटीची देणी थकित असल्याने, महसूल विभागामार्फत न्यायालयाच्या आदेशाने या रकमेच्या वसुलीची प्रक्रियाही सुरू आहे.
चौकट
वसंतदादा कारखान्याने थकीत ऊस बिलापैकी २५ कोटी रुपये दिल्याचे कारखाना व्यवस्थापनाने कळविले आहे. मात्र शेतकऱ्यांची सर्व देणी देईपर्यंत कारखान्याच्या मालमत्ता जप्तीची व लिलावाद्वारे रक्कम वसुलीची कारवाई सुरूच राहणार आहे.
चौकट
वसंतदादा कारखान्याने शेतकऱ्यांची देणी बऱ्यापैकी दिली आहेत. केवळ साडेनऊ कोटी रुपये थकीत असल्याची यादीही आम्ही शासनाकडे सादर केली आहे, तरीही प्रशासनाकडून ५२ कोटीच्या वसुलीसाठी नोटिसा बजाविल्या जात आहेत. त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळेच शेतकऱ्यांची देणी थकीत आहेत. त्यांनी साडेनऊ कोटी रुपयांच्या देण्यापोटी वसुलीची प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. पूर्ण रकमेची वसुली होऊ शकत नाही, असे मत कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी व्यक्त केले.