५० लाखांच्या वसुलीसाठी दीड कोटींच्या प्रॉपर्टीचा लिलाव; महारेराचा बिल्डरला दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 06:34 AM2023-05-05T06:34:27+5:302023-05-05T06:34:37+5:30
पनवेलपाठोपाठ पुण्यात कारवाई, महारेराने जारी केलेल्या वॉरंटसच्या वसुलीसाठी पनवेलपाठोपाठ आता पुण्यातही बिल्डरच्या मिळकतीचा लिलाव जाहीर झाला आहे.
मुंबई : महारेराने मॉड्युलर कन्स्ट्रक्शनला विलंबासाठी ग्राहकाला ४९ लाख ८ हजार ३७६ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र बिल्डरने तक्रारदाराला मुदतीत पैसे दिले नाहीत. महारेराने त्यामुळे यासंदर्भात वॉरंट वसुलीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यानंतर बिल्डरची विष्णू प्रसाद अपार्टमेंटमधील दीड कोटी रुपये किमतीची ८३.२८ चौरस मीटर क्षेत्र मिळकत जप्त करून लिलाव जाहीर करण्यात आला आहे. १० मे रोजी तहसीलदार कार्यालयात हा लिलाव होणार आहे.
महारेराने जारी केलेल्या वॉरंटसच्या वसुलीसाठी पनवेलपाठोपाठ आता पुण्यातही बिल्डरच्या मिळकतीचा लिलाव जाहीर झाला आहे. महारेराने पुणे भागात विविध तक्रारींच्या अनुषंगाने २२७ वॉरंट्स जारी केलेले आहेत. या वॉरंट्सची एकूण रक्कम १७०.३७ कोटी आहे. यापैकी ३९ प्रकरणी ३२.९२ कोटी आतापर्यंत वसूल झाले आहेत. आता शिवाजीनगर भांबुर्डा भागातील बिल्डरला महारेराने दणका दिला असून, पुणे शहर तहसीलदारांनी याबाबत कारवाई केली आहे. बिल्डरला हा लिलाव थांबवायचा असेल तर वॉरंट आणि यासाठी देण्यात आलेल्या जाहिरातीची रक्कम ५ मे पूर्वी त्याला द्यावी लागणार आहे.
महारेरा काय करते ?
घर खरेदीदारांना बिल्डरने वेळेवर ताबा न देणे, प्रकल्प अर्धवट सोडणे, गुणवत्ता न राखणे अशा तक्रारी महारेराकडे येतात.
घर खरेदीदारांच्या तक्रारींवर सुनावणी होऊन व्याज, नुकसान भरपाई, परतावा देण्याचे आदेश बिल्डरला दिले जातात.
बिल्डरने रक्कम दिली नाहीतर ती वसूल करण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असते.
महारेराकडून म्हणून असे वॉरंटस जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जातात.