भविष्यात नाटकाचा प्रेक्षकवर्ग वाढतच जाणार : श्रीकांत मोघे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 05:21 PM2019-11-05T17:21:47+5:302019-11-05T17:24:38+5:30
पन्नासहून अधिक नाटकांत आणि साठपेक्षा जास्त चित्रपटांत आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाचा ठसा उमटविणारे माजी नाट्य संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे बुधवारी, ६ नोव्हेंबरला ९१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
मराठी रंगभूमी दिनानिमित्त श्रीकांत मोघे यांच्याशी 'अतुल चिंचली ' यांनी साधलेला हा संवाद...
मराठी नाटकांच्या भविष्याबद्दल तुमचे मत काय?
मराठी नाटकांना उज्ज्वल भविष्य आहे. भारतापेक्षा अमेरिका, युरोप, दुबई या ठिकणी मराठी नाटके जोरात चाललात. महाराष्ट्रापेक्षा परदेशात मराठी नाटकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो, ही अभिमानस्पद गोष्ट आहे. गेल्या दहा वर्षांत नाटकाला वेगळेपण आले आहे. नाटक प्रेक्षकांसमोर येण्याअगोदर यांत्याची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते. त्यासाठी सर्व माध्यमांचा वापर होतो. भविष्यात नाटकाचा प्रेक्षकवर्ग वाढत जाणार आहे.
पुण्यातील नाट्यगृहांच्या अवस्थेबद्दल तुम्ही काय सांगाल?
मराठी समाज व्यवसायाभिमुख नाही. मुंबई आणि पुण्यात बारा ते पंधरा मराठी नाट्यगृहे आहेत. या नाट्यगृहांत टॉयलेटची अवस्था बिकट असते, पाणी नसते, पार्किंग सुविधा अपुऱ्या असतात अशा अनेक समस्या असतात. त्यासाठी आपण कुठल्याही नाट्यगृहांना दोष देऊन चालणार नाही. नाटक व्यवसायातून नाट्यगृहांना मिळणारा पैसा योग्य ठिकाणी वापरला, तर नाट्यगृहे दुरवस्थेत राहणार नाहीत.
नाटक आणि चित्रपट यांतील वेगळेपण काय आहे?
प्रेक्षक नाटक पाहण्यासाठी पहिल्या रांगेपासून ते नाट्यगृहाच्या क्षमतेनुसार शेवटच्या रांगेपर्यंत बसतात. कलाकाराला नाटक सादर करताना अधिक मेहनत घ्यावी लागते. कारण पहिली रांग रंगमंचापासून दहा फुटांवर असते; पण शेवटची रांग पन्नास ते साठ फुटांवर असते. पुढच्या व्यक्तीला कलाकारांच्या चेहºयावरील हावभाव दिसतात; पण मागच्या व्यक्तीला दिसत नाहीत. चित्रपटात मात्र असे होत नाही. स्क्रीनवर कलाकाराला कष्ट घ्यावे लागतात; पण नाटकाप्रमाणे मेहनत घ्यावी लागत नाही. चित्रपटात कॅमेरा चेहऱ्यावरील हावभाव आणि अभिनय दाखवतो.
मराठी चित्रपटाची हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांशी तुलना केली असता आपला प्रेक्षकवर्ग कमी का दिसतो?
देशाची लोकसंख्या १३० कोटी आहे. हिंदी चित्रपट भारत देशासहित पूर्ण जगात प्रदर्शित होतात. त्यामुळे हिंदीशी आपली तुलना होऊ शकत नाही. मराठी माणसाला दोन्ही भाषा कळतात. मराठीचा प्रेक्षकवर्ग मराठी आणि हिंदी चित्रपट अशा दोन्ही ठिकाणी विभागला गेला आहे. त्यामुळे मराठीला प्रेक्षकवर्ग कमी दिसून येतो. दाक्षिणात्य चित्रपटांच्या लोकांना हिंदी भाषा जास्त कळतच नाही. त्यांना आपल्या भाषेचा अभिमान असून ते फक्त साऊथ चित्रपटाला प्राधान्य देतात.