सभागृह नेते आयुक्तांमध्ये खडाजंगी
By admin | Published: March 1, 2017 02:35 AM2017-03-01T02:35:43+5:302017-03-01T02:35:43+5:30
शहरातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेचे तीव्र पडसाद स्थायी समितीमध्ये उमटले.
नवी मुंबई : शहरातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेचे तीव्र पडसाद स्थायी समितीमध्ये उमटले. लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर व आयुक्तांनी लोकप्रतिनिधींवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. सभागृह नेते जयवंत सुतार व आयुक्तांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याने सभा तहकूब करण्यात आली.
स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये एकमेकांना कोंडीत पकडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पातील अनेक कामे झाली नसल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. वर्षभर नगरसेवकांनी सुचवलेली कामे करण्यात आली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पालिकेची आरोग्य सेवा डबघाईला आली आहे. नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र आरोग्य विभागात अनेक समस्या आहेत; पण पूर्णपणे सर्वकाही कोलमडले नसल्याचे स्पष्ट केले. कोपरखैरणे माता बाल रुग्णालयाच्या दुरुस्तीचे प्रस्ताव नगरसेवकांनीच रखडवला असल्याचा आरोप केला. आयुक्त सर्व खापर नगरसेवकांवर फोडत असल्यामुळे सभागृह नेते जयवंत सुतार यांनी तीव्र आरोप घेतला. प्रशासन स्वत:च्या चुका लपविण्यासाठी नगरसेवकांवर आरोप करत असून आम्ही याचा विरोध करतो, असे स्पष्ट केले. ज्यांनी कोपरखैरणे व तुर्भे माता बाल रुग्णालये बंद केली, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. आयुक्तांनीही आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दोघांमध्ये तू-तू मै-मै सुरू झाल्यामुळे सभापती शिवराम पाटील यांनी सभा तहकूब केली. २ मार्चला पुन्हा सभेचे आयोजन केले आहे.
करवाढ लादू न देण्याची राष्ट्रवादीची भूमिका
महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये शहरवासीयांवर करवाढ लादली जाणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे; परंतु भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा करवाढीला पाठिंबा जाहीर केला आहे.
स्थायी समितीमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही करवाढीचा मुद्दा गाजला. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दीपक पवार यांनी करवाढीला आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. करवाढ शहराच्या हिताची आहे. पेट्रोल, वीज व इतर दर वाढले तर आपल्याला चालते मग शहराच्या हितासाठी करवाढ केल्यास त्याला आक्षेप का घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित केला. भाजपाच्या भूमिकेला राष्ट्रवादी क ाँग्रेसच्या जयवंत सुतार यांनी तीव्र आक्षेप घेतला.
नवी मुंबई महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. करवाढ न करता बारा वर्षे शहराचा विकास केला. यापुढेही करवाढ न करता विकास केला जाईल. कोणत्याही स्थितीमध्ये करवाढ होऊ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. करवाढ करण्यावरून सुरू झालेल्या चर्चेचे पडसाद सर्वसाधारण सभा व शहरामध्येही उमटण्याची शक्यता आहे. करवाढीला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी भाजपाला कोंडीत पकडणार असल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.
>लोकप्रतिनिधींचा अवमान
सभागृह नेते जयवंत सुतार यांनी सांगितले की, आयुक्त तुकाराम मुंढे लोकप्रतिनिधींवर आरोप करत होते. मी म्हणेल तेच खरे असे समजून सभागृहात बोलत असल्याने आम्ही आक्षेप घेऊन सभा तहकूब केली.
>कोंडीचा प्रयत्न
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहात बोलू देत नाही. प्रस्ताव मंजूर करत नाही व पुन्हा आमच्यावर जबाबदारी झटकता हे योग्य नाही. आम्ही नियमाप्रमाणे काम करत असल्याचे स्पष्ट केले.
>सहनशीलतेचा अंत पाहू नका - पाटील
महानगरपालिकेने प्रकल्पग्रस्तांविषयी भूमिका स्पष्ट करावी. घरांवरील कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रत्येक गावात बैठका सुरू असून या असंतोषाचा भडका उडेल, असा इशारा सभापती शिवराम पाटील यांनी दिला. स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना सभापती शिवराम पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या विषयाकडे लक्ष वेधले. महानगरपालिकेने प्रकल्पग्रस्तांविषयी भूमिका स्पष्ट करावी. शासनाने राज्यातील २०१५पर्यंतची घरे कायम करण्याची घोषणा केली आहे; पण पालिका गावठाणांमधील घरांवरही कारवाई करत आहे. ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रत्येक गावात बैठका सुरू आहेत. आंदोलनाची तयारी सुरू आहे. महापालिकेने भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. ा्रकल्पग्रस्तांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असेही स्पष्ट केले. प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनीचा त्याग केला असल्याचेही सांगितले. आयुक्तांनी याविषयी भूमिका स्पष्ट केली. २०१५ पूर्वीच्या बांधकामांवर कारवाई केली जात नाही. त्यानंतर जी बांधकामे सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. प्रकल्पग्रस्तांची जमीन शासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण करून संपादित केली असून मोबदला दिला आहे, असे स्पष्ट केले. या
वक्त व्यावर सभापतींनी तीव्र आक्षेप घेतले.