ऐन दिवाळीत सुगीचा हंगाम जोरात
By Admin | Published: October 31, 2016 04:43 AM2016-10-31T04:43:36+5:302016-10-31T04:43:36+5:30
आजरा तालुक्यात भात कापणी व मळणीला वेग आला असून ऐन दिवाळीच्या सणात सुगीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे.
कृष्णा सावंत,
आजरा (कोल्हापूर)- आजरा तालुक्यात भात कापणी व मळणीला वेग आला असून ऐन दिवाळीच्या सणात सुगीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. सर्वच जातीच्या भात कापणीला वेग आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात तालुक्यातील शेतकरी भात कापणीत मग्न झाला आहे. दिवाळी सण सुरू व्हायलाच भात कापणीला आले आहे. सण साजरा करायला शेतकऱ्यांना सवड नसून शेतातच मळणीच्या रूपात शेतकरी सण साजरा करत आहे.
यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने माळरानावरील भात पिके कापणीला आली आहेत. माळरानावरील भात जोमाने वाढली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याने दिवाळीऐवजी सुगीला प्राधान्य दिले आहे. तालुक्यातील शेतकरी गावाऐवजी रानात मोठ्या प्रमाणात दिसत आहे. बहुतांश शेतकरी सुगीच्या धांदलीत दिवाळीचा सणच विसरून गेले आहेत. यावर्षी आजरा बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. शेतकरी वर्गाचा खरेदीसाठीचा अल्प प्रतिसाद दिसला. त्यामुळे सुगीच्या धामधुमीत दिवाळीचा धमाका कमी झाला आहे. तालुक्यातील सर्वच गावातील शेतकरी सुगीत गुंग झाला आहे.
चालू वर्षी भात उतारा घटला यावर्षी पाऊस चांगला झाल्याने भात उत्पादनात वाढ होईल असे वाटत होते. मात्र, यावर्षी भात उत्पादनात घट दिसून येत आहे. त्याऐवजी गतवर्षी पाऊस नसतानाही भाताच्या उताऱ्यात वाढ होती.
आजरा तालुक्यातील परिस्थिती, शेतकऱ्याची दिवाळी शेतात
पेरणोली (ता. आजरा) येथील शेतकरी बैलांच्या सहाय्याने लोप पावत चाललेली भात मळणी आजही जिवंत ठेवला आहे.